Pandharpur

पंढरीत माघी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी वाढली

पंढरीत माघी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी वाढली

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : राज्यात विविध भागात कोरोना पुन्हा हातपाय पसरू लागला असताना प्रशासनाच्या सुस्तपणामुळे पंढरीला कोरोनाचा सर्वाधिक धोका भेडसावू लागला आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांत चिंतेचा विषय बनला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला होता तेंव्हापासून पंढरपूर आणि जिल्हा प्रशासनानेही जीवापाड राबून काम केले होते आणि त्याचे प्रचंड कौतुकही झाले होते पण ते चित्र आता दिसेनासे झाले आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही जिल्ह्यात तर पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले असून लॉकडाऊनची गरज निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने शासनही चिंतेत असून त्या दृष्टीने पावलेही टाकू लागले आहे पण पंढरीत मात्र उलटेच चित्र दिसू लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून मंदिर समितीने माघी यात्रेतील दशमी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घोषित केला आहे पोलीस प्रशासनानेही माघी यात्राकाळात दोन दिवसांच्या संचारबंदीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे पण या प्रस्तावावर अद्याप काहीच निर्णय झाला नाही. दरम्यान पंढरीत भाविकांनी आत्तापासूनच गर्दी केली असून कोरोना नियमांची अक्षरशः वाट लावण्यात आली आहे. मंदिर परिसरातही गर्दी होत असून भाविक विनामास्क दिसत आहेत. राज्याच्या अनेक भागात कोरोना पुन्हा फोफावताना दिसत असून राज्याच्या विविध भागातील भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. दशमी, एकादशीला विठ्ठल दर्शन बंद असल्याने भाविकांनी आधीच गर्दी सुरु केली असून स्थानीक भाविकांचाही या गर्दीत समावेश होत आहे. अनेक दिंड्याही पंढरीत दाखल झाल्या असून त्यांचे आगमन सुरूच आहे. परगावाहून आलेले भाविक अथवा स्थानिक भाविक आणि व्यापारीही तोंडावर मास्क लावताना दिसत नसून कोरोनाचा पुरता विसर पडला असल्याचे दिसत आहे. चार यात्रांपैकी एक असलेली माघी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आलेली असून दिनांक २३ फेब्रुवारी रोजी एकादशीचा दिवस आहे, पुन्हा दर्शन मिळणार नाही म्हणून भाविक आत्ताच गर्दी करीत असून कोरोनाचेही नियम पाळले जात नाहीत. या सर्व मुक्त वावरामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढणार असल्याची भीती यामुळे व्यक्त होत आहे. राज्यभर वाढत्या कोरोनाची चिंता व्यक्त होत असताना आणि प्रशासन सतर्क होत असताना पंढरीत मात्र कशासाठी सुस्तपणा आहे हे न समजणारे कोडे बनले आहे. या प्रकारामुळे मात्र कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होऊन स्थानिक नागरिकांना याची मोठी किंमत चुकवावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे. .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button