Pandharpur

वाळू उपशाने पंढरीच्या घशाला कोरड पडण्याचा धोका भरदिवसा केला जातोय हजारो ब्रास वाळूचा उपसा

वाळू उपशाने पंढरीच्या घशाला कोरड पडण्याचा धोका भरदिवसा केला जातोय हजारो ब्रास वाळूचा उपसा

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर तालुक्यातील अनेक गावाच्या हद्दीतून तसेच पंढरपूर शहराच्या नदीकाठच्या अनेक भागातून दररोज हजारो ब्रास वाळूचा उपसा केला जात आहे.भर दिवसा सुरू असलेली ही लूट प्रत्येक सामान्य नागरिकाला दिसत असली तरी प्रशासनाच्या डोळ्यावर पट्टी नेमक्या कोणत्या कारणांमुळे असा प्रश्न यानिमित्ताने पडत आहे.दोन दिवसांपूर्वी पंढरपूरचे प्रांताधिकारी श्री सचिन ढोले यांनी तालुक्यातील व्होळे गावात केलेल्या कारवाई दरम्यान शेकडो ब्रास वाळूचा साठा तसेच अनेक वाहनातून जेसीबीच्या साहाय्याने वाळू वाहतूक होत असल्याचे आढळून आले.ह्याच होळे गावप्रमाणेच आज पंढरपूर तालुक्यातील कित्येक गावांमध्ये जेसीबी मशीन व टिपरच्या साहाय्याने हजारो ब्रास वाळूचा उपसा रोज सुरू असल्याचे दिसून येत आहे. क्वचित एखादे गाव सापडेल की जिथे वाळू उपसा होत नाही.ज्याप्रमाणे व्होळे या गावात मोठ्या प्रमाणात वाळू सुरू होता त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक गावांत बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.स्वतः मलई खाण्यासाठी वाळूचोरांना हाताशी धरुन नदीचा सौदा करणारे महसूल कर्मचारी ह्या वाळू चोरीत महत्वाची भूमिका बजावत आहेत.त्यामुळे मुजोर झालेल्या वाळूचोरांची मजल महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याइतपत जात आहे.सर्वसामान्य शेतकऱ्यांना साधी बोअर पाडण्यासाठी हजारो वेळा आडकाठी घालणारे प्रशासन वाळू चोरीच्या वेळी गंधारीच्या भूमकेत कसे काय जाते हे वेगळे सांगायला नको. पर्यावरण खात्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचे कारण देत नदीचे पात्र सुरक्षित राहावे यासाठी काही वर्षांपासून बोटींच्या साहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या वाळू ठेक्यांवर बंदी आणली होती.या निर्णयामुळे तालुक्यातील जवळपास सर्वच ठेके बंद पडले.वाळू उपसा करण्यासाठी बोटींना बंदी करण्यात आल्याने नवीन लिलाव घेण्यासाठी कुणीही पुढे आले नाही.मात्र असे असले तरी या निर्णयामुळे महसुलसाठी शासकीय वाळू उपसा बंद झाल्याने नदीपात्रातील वाळू साठ्यात वाढ होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात घट होऊ लागली आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे अवैध वाळूउपसा करणाऱ्या वाळूचोरांनी प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध प्रकारची आमिषे दाखवत आपल्या हाताशी धरून पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातील मौल्यवान अशा काळ्या सोन्याची लूट करण्यास सुरुवात केली आहे.शासनाने त्यांनतर अनेकवेळा वाळू ठेक्यांचे लिलाव काढण्याचा प्रयत्न केला.मात्र याच वाळूमाफियांनी मुद्दाम ग्रामपंचायतींना पुढे करत या वाळू ठेक्यांना विरोध केला आणि आपली लूट सुरूच ठेवली.

आज पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीची बेसुमार वाळू उपशाने किती दुर्दशा झाली आहे हे वेगळे सांगायला नको.गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत पंढरपूरच्या महसूल प्रशासनाने अनेकदा अवैध वाळूचोरीच्या विरोधात कारवाया केल्या आहेत.पण त्या केवळ दिखाव्या पुरत्याच राहिल्या आहेत.कारण अशा कारवाया कितीही झाल्या असल्या तरी अवैध वाळू उपशाला कोणताच फरक पडलेला नाही.त्यामुळे पंढरपूरचा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सध्या तरी कुणीच वाली नाही असेच म्हणता येईल. सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या काळात वाळू माफियांवर त्यांनी बसवलेली वचक त्यानंतर आलेल्या कोणत्याच जिल्ह्याधिकाऱ्याला टिकवता आलेली नाही.सध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसल्याने ही लूट अशीच किती दिवस सुरू राहणार हे पाहावे लागेल.

सामान्यांना दमबाजी करणाऱ्या प्रशासनाची कर्मचाऱ्यांबद्दल मात्र मिळमिळीत भूमिका

आजवर अनेकदा अवैध वाळू उपसा सुरू असणाऱ्या ठिकाणी महसूल प्रशासनाने मोठ मोठ्या कारवाया केलेल्या आहेत.त्यावेळी शेकडो ब्रास वाळूचा साठाही जप्त करण्यात आलेला आहे.मात्र ज्या गावात अवैध वाळू उपसा सुरू होता त्या गावातील अवैध उपशाला माफियांकडून मिळणाऱ्या आमिषाला बळी पडून कायम पाठबळ देणाऱ्या त्या गावातील स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांना मात्र नेहमीच पाठीशी घालण्याची भूमिका इथल्या प्रशासनाने आजवर पार पाडलेली आहे.तक्रार करणाऱ्या व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात मात्र हा विभाग मात्र अग्रेसर आहे.वाळूचोरीची तक्रार देणाऱ्याचेच नाव वाळूचोरांना परस्पर सांगून भांडणे लावून देण्यातही काही स्थानिक महसूल कर्मचारी पटाईत आहेत.त्यामुळे नक्की तक्रार कुणी करायची आणि वाईट कुणी व्हायचे यामुळे लोक घाबरून तक्रार घ्यायलाही पुढे येत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.मात्र गावात अवैध वाळूउपसा सुरू असूनही त्याची माहिती लपविणाऱ्या तलाठी,पोलीस पाटील यांच्यावरही कडक कारवाई करण्याचे धाडस सध्याच्या तरी इथल्या प्रशासनात नाही हे मात्र खरे.

जिल्हाधिकारी-पालकमंत्री देणार का लक्ष

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीतील चंद्रभागा वाळवंटातील अनेक ऐतिहासिक मंदिरे बेसुमार वाळू उपशामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तसेच पंढरपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्याचा भरावा उकरण्याचे काम वाळूचोरांनी सुरू केल्याने इथल्या अनेक झोपडपट्ट्यांना व बंधाऱ्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे लाखो पंढरपूरकरांचा घसा यामुळे कोरडा पडला तर नवल वाटायला नको.त्यामुळे स्थानिक प्रशासन जरी दुर्लक्ष करत असले तरी सोलापूरचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर हे ह्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पंढरीचा अमूल्य ठेवा जपणार की दुर्लक्ष करणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button