Kolhapur

वैज्ञानिक दृष्टिकोन,कवी मन असणारे शिक्षक गोविंद पाटील -संपत गायकवाड

वैज्ञानिक दृष्टिकोन,कवी मन असणारे शिक्षक गोविंद पाटील -संपत गायकवाड

सुभाष भोसले-

कोल्हापूर स्वत:चे आचरणातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे देणारा व घराच्या वास्तूशांतीत( वास्तूप्रवेश समारंभात) जमलेल्या पैशातून जि.प.आश्रम शाळेच्या मुलांसाठी स्वच्छतागृह बांधून देणारा कवी मनाचा शिक्षक गोविंद पाटील होय .

गोविंद पाटील किल्ले भुदरगड येथील जि.प.च्या आश्रमशाळेत शिक्षक होते. आज ते जि.प.च्या शाळेत शिक्षक आहेत.पहाडी आवाजाचा प्रतिभासंपन्न कवी व अनोखी शीळ गाणी गाणारा अनोखा कलावंत अशी सरांची ओळख संपूर्ण विभागास आहे.
गोविंद पाटील किल्ले भुदरगड आश्रमशाळेत शिक्षक असताना हजर झाल्यानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी ते आपल्या सहकाऱ्यांसह आश्रमशाळेत मुक्कामाला थांबले.भुदरगडच्या पायथ्याशी सोमवार पेठेत शाळेच्याच दोन जुन्या खोल्या.. एक मुलांच्या राहण्यासाठी आणि दुसरी स्वयंपाकघर… जांभ्या दगडाच्या गराड्याने वेढलेली…सापाकिरड्यांचे भय असलेली… या खोलीत बावीस मुलं मुक्कामाला… खिडक्यांना ना धड दारं ना जाळी… जेवणापूर्वी मुलांशी गप्पा मारताना या खोलीत दोनदा साप आल्याचं मुलांनी सांगितलं… माझा मुलगा मी अशा ठिकाणी ठेवू शकलो असतो का ? असा विचार गोविंद पाटलांच्या मनात रात्रभर धिंगाणा घालत होता… सकाळी लवकर उठून त्यांनी जाळी आणून ती खिडक्यांना लावून घेतली.

शाळेची मुले कडाक्याचे थंडीतही बाहेर आंघोळ करताना पाहिली. बाथरूम नसल्याने मुले बाहेरच आंघोळ करतात हे लक्षात आले. स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरांनी कोल्हापूर येथे फ्लॅट घेतला होता. त्याची वास्तूप्रवेशाची तारीख निश्चित झाली. सरांनी निमंत्रण पत्रिकेत टीप लिहिली.—–“वास्तुशांतिसाठी प्रेझेंट स्विकारली जातील पण आहेर म्हणून वस्तू न आणता नवीन घरात ठेवलेल्या बॉक्समध्ये रोख रक्कम टाकावी. जमणारी सर्व रक्कम भुदरगड ग.शि.अ. यांचेकडे देऊन सदर रक्कमेतून आश्रमशाळेच्या मुलांसाठी बाथरूम बांधणार आहे.” लोक वास्तुशांति वा लग्नात आलेल्या आहेराच्या रक्कमेतून झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करतात. काढलेले कर्ज फेडतात.पण गोविंदसारखा वेडा माणूस सदर रक्कमेतून जि.प.आश्रम शाळेतील मुलांसाठी बाथरूम बांधतो. अंत:करणात जेव्हा भावना घर करते तेव्हाच माणसं वेड्यासारखं कार्य करत असतात. जातिवंत शिक्षक असाच असतो. मुलांचेप्रती करूणा, प्रेम, दया, आपुलकी व आत्मियता त्याच्यात ठासून भरलेली असते. तत्त्वज्ञान सांगणारे खूप असतात , पण आचरणात आणणारे फारच कमी असतात. गोविंदसरांनी वास्तुशांति करताना कोणताही धार्मिक विधी केला नाही. संविधान, रोप, महात्मा फुले यांच्या फोटोंचे पूजन केले. रोख जमलेल्या रूपये २५,०००/ निधीतून व शैक्षणिक उठावातून आश्रम शाळेतील मुलांसाठी प्रशस्त बाथरूम बांधले. .

काकवाई… नवले मेघोलीच्या घाटात आजरा रोडवरील धनगरांची देवी …देवीचे मंदिर नाही पण देवी अत्यंत जागरूक अशी लोकांची श्रद्धा आहे. देवीस भक्तीभावाने ब्लाऊज पीस अर्पण केले जातात. पीस मंदिर नसल्याने दोरीला टांगलेले असतात. ऊन,वारा, पाऊस व थंडीत ते तसेच लटकत असतात.पिसांचा वापर होत नाही. पुजारीही घरी घेऊन जात नाही. बरीच वर्षे हे चालू आहे. गोविंदसर सानेगुरूजी व नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचे अनुयायी.सरांनी खूप विचार करून सर्व पीस जमा केले. लोकांनी देवीचा कोप होईल, पाप लागेल असं करू नका हे सांगितलं पण ऐकतील ते सर कसले? सरांनी सर्व पिसच्या पिशव्या शिवल्या ज्यांना पाहिजे त्यांना मोफत वाटल्या. आजअखेर कसलाही कोप सरांच्यावर झाला नाही. आज लोकभावना सरांच्या बाजूने आहेत. लोकांनी भक्तिभावाने अर्पण केलेल्या पीसच्या पिशव्यांचा घराघरांत वापर होत आहे. शिक्षक म्हणजे बहुजन समाजाने आचरणात आणावयाच्या मूल्यांचा ठेवा असतो. आश्रम शाळेत असताना सरांनी मुलांकडून “रूजवण” हा मुलांचा महाराष्ट्रातील पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध केला होता.

त्यांच्या या अंकाची दखल महाराष्ट्रातील प्रथितयश दैनिकांनी घेतली होती.आकाशवाणी कोल्हापूर केंद्राने या अंकावर आधारित तीन कार्यक्रम बालजगत या सदरात प्रसारित केले होते. पुढे महाराष्ट्राचे लाडके संगीतकार सलील कुलकर्णी यांनी “मधली सुट्टी” या कार्यक्रमात कवींची शाळा म्हणून या उपक्रमाची झी टीव्ही मराठीवर विशेष दखल घेतली होती. सह्याद्री दूरदर्शननेही माझी शाळा या सदरात या मुलांना स्थान दिले होते.
. पुढे याच मुलींतून कुमारी रमिजा जमादार ही विद्यार्थीनी कवयित्री म्हणून उदयास आली. मिरज येथे झालेल्या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तिने भूषविले
. सरांचा जनसंपर्क आणि भुदरगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने त्यांनी आश्रमशाळेतील गरीब आणि वंचित मुलांसाठी इनव्हर्टर, स्वेटर, क्रीडा साहित्य, गणवेश, ब्लँकेट, मोफत सहल, व्याख्याने, हस्तकला, निसर्ग भेटी, लेखकांच्या भेटी, साहित्य संमेलन, कथाकथन, लेखन कार्यशाळा घेतल्या आहेत.शिवाय दरवर्षी दिवाळी सुट्टीत मुलांसाठी जाणीव जागृती शिबीर ते आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घेत आहेत. हे सर्व मुलांसाठी मोफत असते. . प्रवाहाच्या उलटे पोहताना त्रास हा होतोच,पण सर कधीच थांबत नाहीत. विज्ञानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन करणे, विज्ञानमूल्ये लहानवयातच रूजवण्याचा प्रयत्न करणे, मुलांच्या मनात प्रश्न विचारून जिज्ञासा निर्माण करणे हे सर्व सातत्याने कुणाशी संघर्ष न करता करत राहणे हा सरांचा स्थायीभाव बनला आहे. शिक्षणाबरोबरच जगण्याची कला शिकविण्यावर सरांचा नेहमीच भर राहिला आहे. एकविसाव्या शतकातील शिक्षक कसा असला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गोविंद पाटीलसर होय. मुलांचे अंतकरण ओळखून जमेल तशी फुंकर घालता येणे हे फक्त मातेचे ह्रदय असणारा माणूसच करू शकतो. चाकोरीबाहेर जाऊन काम करत राहिलो तर यशस्वी होता येतं.किमानपक्षी यशस्वी नाही झालो तरी मनाचं समाधान साधता येणं काही कमी नाही
अशी प्रतिक्रिया संपत गायकवाड यांनी व्यक्त केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button