Amalner

? निसर्गाचा अक्षय ठेवा जतन करू या…अक्षय तृतीया

? निसर्गाचा अक्षय ठेवा…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर…

तालुक्यात लॉक डाऊन सुरू आहे सध्या वातावरण अस्थिर आहे पण निसर्ग थांबत नाही.. सभोवताली बदलेल्या निसर्गामुळे अक्षय तृतीयेची चाहूल लागते… आंबट गोड कैरी,प्रचंड ऊन,संध्याकाळी अवकाशात पसरणाऱ्या विविध रंग छटा, झाडांना फुटणारी नवीन पालवी,कडू निंबाचा गोड कडवट सुवास,विविध फळांचे आगमन म्हणजेच अक्षय तृतीया..

अक्षयतृतीया म्हणजे वसंतऋतू… या वसंतात सगळा आसमंत जणू बाल्य अवस्था संपवून तारुण्यात प्रवेश करत असतो. सगळी झाडे फुललेले असतात ती
रंगाने आणि गंधाने. जिकडे नजर जाते तिकडे फुलांनी आपली शाल पांघरलेली दिसते. एखाद्या सलज्ज यौवनेसारखा बहावा त्या पिवळ्या धमक साजाने
बहरलेला असतो अन् जणू तो अधोमुख झालेला असतो.बहाव्याचे ते असे पिवळे सोनसळी माळा मिळवणारे झाड पाहिले ना की डोळ्यांचे पारणे फिटते आणि तो
नाजूक स्पर्शाचा, पिवळा बहावा मनभर पसरत जातो. या बहाव्यालाच कॅशिया म्हणतात. इतके देखणे दिसते हे झाड, त्याच्या त्या पिवळ्या फुलांच्या माळा अशा पाहिल्या की हिंदीत फुलांच्या साजाला ‘सेहेरा’ म्हणतात तसा सेहेरा या झाडाने घातलाय की काय असे वाटते.

? निसर्गाचा अक्षय ठेवा जतन करू या...अक्षय तृतीया

याच वसंत ऋतूत पक्षांचा चिवचिवाट सुरू होतो. या काळात कावळे,चिऊताई आजूबाजूला दिसतात. त्यांचे प्रियाराधन सुरू होते. कोकिळ अगदी आर्त साद घालत असतो.भारद्वाज दिसतात अनेक पक्ष्यांच्या चिवचिवाटाने अन् रसभरल्या गंधाने आणि चहूबाजूने पसरलेल्या रंगाच्या गालिच्याने पहाट अगदी प्रसन्न होते. या दिवसांचे वैशिष्ट्य म्हणजे या काळातल्या पहाटवेळा फार सुखद अशा गारव्याच्या असतात. सुखाची छान झुळूक अंगावरून जात असते. असा हा अक्षयतृतीयेचा
वैशाखमास.एकी कडे वैशाख वणवा पेटलेला असतो तर दुसरीकडे निसर्ग रंगांची उधळण करत असतो.

फुललेला गुलमोहर… या पिवळ्या केशरी रंगाच्या शिडकाव्यात मग नीलमोहोर, आपले राज्यफूल ताम्हनदेखील आपले रंगवैभव मिरवीत असतात,
ताम्हनाचा निळा रंग खरेतर खूप सुखावतो डोळ्यांना,आल्हाददायक वाटते त्या निळ्या, सावळ्या रंगमोहनाकडे पाहिले की..

सोनचाफा ही खूप फुलतो या काळात. सोनचाफ्याचा सोनसळी रंग वेड लावणारा
असतो आणि त्या सोनसळी रंगाबरोबरच सोनवर्खी सुगंध; मन अगदी आनंदविभोर होते. पानांनी पण कोवळेपणाचा तुकतुकीत लालसर रंग टाकून आता
हिरवागार शेला अंगभर पांघरलेला असतो. रस्त्याच्या कडेने बोगनवेल ही फुललेली असते. त्याच्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचे गेंद पाहिले की खूप मोठ्या सोहळ्याला आपण आलो आहोत असे वाटते….मोठ्या वृक्षाची रंगपंचमी जशी सुरू असते तसेच छोटी झाडे कशी मागे राहातील. पारिजात, गुलाब, जास्वंद, कृष्णकमळ अगदी अंगभर मोहरतात. बकुळ, सुरंगी, देवचाफा अगदी तुकतुकीत पानांसह रसगंधाने धुंद झालेले असतात. वातावरणात पहाटेपासून एक संमिश्र सुगंध पसरायला लागतो.
उमललेल्या सोनचाफ्याचा, पारिजातकाचा, त्यातल्या त्यात गुलाबी गावठी गुलाबाचा
त्याच्यासारखाच तलम सुगंध.

? निसर्गाचा अक्षय ठेवा जतन करू या...अक्षय तृतीया

या काळातील वातावरणाचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसा तापमान उष्ण असले तरी रात्री मोठ्या आल्हाददायक असतात. रात्री मग मोगऱ्याच्या कळ्या तरारतात, त्याचा गंध हवेत पसरायला लागतो….मोगरा कळ्यांनी लगडलेला असतो. साधा मोगरा, बट मोगरा,वेली मोगरा सगळेच कळ्यांनी लगडलेले असतात. रात्री असा मंद गंध यायला सुरुवात होती, जशा कळ्या टपोरल्या जाता तसा त्यांचा सुगंध बाहेर पडतो.
रात्रीच्या सुगंधावरून आठवले रातराणी तर नुसती
घमघमत असते. रातराणीचा गंधही फार मादक….रात्रभर त्या गंधात बुडावे असे वाटते.

अशा या रंगात गंधातरंगलेले गंधाळलेले दिवस आणि रात्र या वैशाखात
अक्षयतृतीये दरम्यान असतात.
उष्म्यामुळे तनामनाला आलेली मरगळ घालवणारा हा निसर्गोत्सव.

या काळात फळेही कसे मागे राहतील. आंबे हिरवटपणा सोडून घमघमायला लागतात. आंबा म्हणजे फळांचा राजा, या राजाचे आगमनही या निसर्गाच्या राज्यात याच काळात होते. चिकू, जांभळे, करवंदे, यांनी झाडे बहरतात. खरबूज, टरबूज, कलिंगड यांचीही रेलचेलच असते.या फळा-फुलांच्या साम्राज्यात
मग त्याचे अनभिषिक्त चाहते कसे दूर राहणार.

? निसर्गाचा अक्षय ठेवा जतन करू या...अक्षय तृतीया

अक्षय तृतीयेच्या मुहूर्त या निसर्गाच्या सोहळ्याबरोबरच या अक्षयतृतीयेच्या दिवसाचे हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे.याबाबत अनेक आख्यायिका दंत कथा प्रचलित आहेत.
या दिवशी शेतकरी शेताच्या मशागतीच्या कामाला सुरुवात करतात. अक्षयतृतीयेच्या
शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही याच काळात मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे. या दिवशी दान, हवन केलेले
क्षयाला जात नाही, आणि पितरांविषयी केलेले कार्य अविनाशी होते. महत्त्वाचे म्हणजे या दिवशी सोने खरेदी करून घरातील सोन्यात ठेवल्यास सोने कधीही चोरीला जात नाही, असे म्हणतात. हा दिवस त्यामुळे ज्ञान परंपरपरेचा सुवर्णयोग मानला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे
फळ अक्षय, कायम टिकणारे असे मिळते, असा समज आहे. अक्षयतृतीयेला सुरु केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’ असे मिळते, असे म्हणतात.

तेव्हा आपणही या निसर्गदेवतेने आपल्याला दिलेल्या ह्या ठेव्या ला जतन करू या .
या अनमोल निसर्ग ठेव्याची जोपासना करण्याचा संकल्प करायला हवा.
वनौषधींच्या आधारे आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड करून नव्या जगावर भारतीय आरोग्य पद्धतीचा प्रभाव टाकण्याचा आपण संकल्प करणे आवश्यक आहे. अशी ही
अक्षयसुखाची अक्षयतृतीया, या दिवशी अनेक झाडे लावली पाहिजे आणि ती जगवली पाहिजे, तरच हा रंगगंधाचा ठेवा अक्षय्य राहील. पाण्यासाठी पाऊस आला पाहिले आणि पावसासाठी झाडे लावली पाहिजे ही निसर्गसाखळी जाणून घेऊन झाडे वाचवा आणि पाणी वाचवा हा आता अक्षयतृतीयेच्या पूजेचा महामंत्र असावा. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब साठवला तर आणि प्रत्येक झाड जगवले तर हा निसर्गदेवतेचा ठेवा आपण अक्षय्य जतन करू शकू.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button