चाकूचा धाक दाखवत दुकानदाला लुटणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात
रजनीकांत पाटील अमळनेर
Jalgaon : कपाट खरेदीचा बहाणा करून दुकानात शिरलेल्या दोन भामट्यांनी दुकानदारास चाकूचा धाक दाखवत पैसे व मोबाइल लांबवले होते. २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता शाहूनगर भागात ही घटना घडली होती. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना गुरुवारी अटक केली.
दीपक चैनराज ललवाणी (वय ३२, रा. मुसळी फाटा, ता. धरणगाव) व दीपक भिका चव्हाण (वय ३२, रा. इंद्रनिल सोसायटी, जळगाव) असे अटक केलेल्या दोन्ही भामट्यांची नावे आहेत.
शाहुनगरातील पिंप्राळा रोड परिसरात विलास मुरलीधर नाईक यांचे कपाट विक्रीचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी दोघांपैकी एक भामटा सुरुवातीला नाईक यांच्या दुकानात गेला. त्याने कपाट खरेदी करण्याबाबत विचारणा केली.
या वेळी कपाट शिल्लक नाहीत असे नाईक यांनी सांगितले. काही क्षणातच दुसरा भामटा दुकानात शिरला. त्याने चाकूचा धाक दाखवत नाईक यांना धमकावले. नंतर दुकानाचे शटर आतून बंद करून घेतले. यानंतर नाईक यांच्या शर्टच्या खिशातील एक हजार रुपये व काउंटरवरील दोन मोबाइल उचलून दोघांनी पळ काढला होता.
या प्रकरणी नाईक यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित हे मुसळी फाटा येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. पथकाने मुसळी फाटा येथून दोघांना ताब्यात घेतले






