शेती ट्रान्सफार्मरच्या प्रश्नांसाठी आमदारांची शेतकऱ्यांसह वीज कार्यालयात धडक
??व्हिडीओ कॉन्फरन्सने मुख्य अभियंता जळगाव यांच्याशी संवाद
??येत्या ८ दिवसात ट्रान्सफार्मरचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
??शेतकऱ्यांकडून कुणीही पैश्यांची मागणी केल्यास आमदार कार्यालयात संपर्क साधण्याचे व वीजचोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन
मनोज भोसले
चाळीसगाव – अवकाळी पावसाच्या अस्मानी संकटाने आधीच शेतकऱ्यांचे एक पिक वाया गेले आहे, त्यातच वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे २७ गावातील ट्रान्सफार्मर तीन ते साडेतीन महिन्यांपासून बंद आहेत. स्थानिक कर्मचारी हे शेतकऱ्यांकडून पैश्यांची मागणी करत आहेत. अश्या परिस्थितीत दुसरे पिक सुद्धा हातातून जाण्याचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. भोरस गावातील शेतकऱ्यांनी ही व्यथा आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे मांडली असता त्यांनी तात्काळ शेतकऱ्यांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या लक्ष्मीनगर येथील कार्यालयाला धडक दिली. याचवेळी कार्यकारी अभियंता यांची व्हिडीओ कॉन्फरन्स सुरु असताना आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट मुख्य अभियंता यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मागील २० दिवसांपासून मी कार्यकारी अभियंता शेंडगे साहेब यांच्याकडे तालुक्यातील बंद पडलेल्या २७ ट्रान्सफार्मर दुरुस्ती बाबत पाठपुरावा करीत आहे. मात्र ४ – ५ दिवसात प्रश्न मार्गी लागेल असे तोंडी आश्वासन आजपर्यंत मिळत होते. आधीच शेतकरी अवकाळी पावसाने अडचणीत आहे, पहिले पिक वाया गेल्यानंतर आता दुसरे पिक जर वीज नसल्याने वाया जाणार असेल पुन्हा शेतकऱ्यांना उभे करणे शक्य होणार नाही. साडेतीन महिने जर शेतकऱ्यांना वीज मिळणार नसेल तर हा प्रश्न मला विधानसभेत मांडावा लागेल. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून लोकांनी मला आमदार केले आहे, त्यांचे प्रश्न सोडविणे ही माझी जबाबदारी आहे, ट्रान्सफार्मरच्या नट चा पैसा सुद्धा वीज वितरण कंपनी देत असताना तुमचे कर्मचारी कशाचे पैसे शेतकऱ्यांकडून घेतात असा जाब विचारत माझ्या तालुक्यात असे चीरीमरी चे प्रकार खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर मुख्य अभियंता यांनी येत्या ८ दिवसात सर्व ट्रान्सफार्मर सुरु करण्यात येतील व शेतकऱ्यांकडून पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, वाघळीचे सरपंच विकास चौधरी, अनुसूचित आघाडी शहराध्यक्ष सुबोध वाघमारे यांच्यासह भोरस येथील रामचंद्र पवार सर, भाऊसाहेब विळे, रावसाहेब सोनवणे, संजय वाणी, रविंद्र विळे, सागर पवार, रविंद्र सोनवणे, जयवंत पाटील, छोटू विळे आदी शेतकरी उपस्थित होते.
??शेतकऱ्यांकडून कुणीही पैश्यांची मागणी केल्यास आमदार कार्यालयात संपर्क साधण्याचे व वीजचोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन
चाळीसगाव तालुक्यातील भोरस येथील शेतकऱ्यांकडून ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याची शेतकऱ्यांनी तक्रार केल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी कंपनीच्या मुख्य अभियंता यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले आहे. चाळीसगाव तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्यांकडून वीज वितरण कंपनीचे कर्मचारी – अधिकारी पैसे मागत असल्यास त्याची माहीती माझ्या घाटे कॉम्प्लेक्स येथील संपर्क कार्यालयात द्यावी, कुणालाही चिरीमिरी देऊ नये, तसेच गावात होणाऱ्या वीजचोरीमुळे देखील मोठ्या प्रमाणात भार हा ट्रान्सफॉर्मर वर पडत असल्याने वीजचोरी थांबविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.






