संत सेवालाल : क्रांतिकारी युग पुरुष
सोमनाथ माळी चाळीसगाव
संत सेवालाल महाराज यांचा जन्म माघ कृष्ण पक्ष शके 1661 म्हणजेच दिनांक 15 फेब्रुवारी 1739 रोजी गोलाल डोडी ता. गुत्ती जि. अनंतपूर (आंध्र प्रदेश ) येथे झाला.
त्यांचे वडील हे तेथील तांड्याचे नाईक होते.त्यांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धरमणी होते. सेवालाल हे सर्वात ज्येष्ठ पुत्र होते. त्यांना घरात लाडाने सेवाभाया असे म्हटले जाई. त्यांना बद्दू, हप्पा आणि भाणा अशी भावंडे होती.
सेवालाल यांचा स्वभाव संसाराच्या दृष्टीने विरक्त होता. समाजातील वाईट चालीरीती, अंधश्रद्धा व फसवणूक यामुळे समाजाची होणारी अधोगती त्यांना सहन होत नव्हती. त्यामुळे त्यांनी समाज परिवर्तनाचा निर्धार केला.
यासाठी आजन्म अविवाहित राहून समाज सुधारणा करण्याचा त्यांनी दृढ निश्चय केला.
त्या काळी बंजारा समाज अतिशय हलाखीचे जीवन जगत होता.
लाद चला बंजारा
ले चला अपना संसार
बैल चले गी चले
थाट से चले सांडरे
सांड की गरजना सुनकर
भाग चले जंगल के शेर
अस बैलांच्या पाठीवर धान्याची गोणी वाहण्याचे कार्य करणाऱ्या बंजारा समाजाचे वर्णन केले जाई.
या अडाणी व अतिमागास समाजाला मानवतावादाची शिकवण देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य त्यांनी सुरु केले.
समाज प्रबोधनासाठी वचने, लोकगीते, लडी, कवणे व भजन या सर्वांचा अवलंब त्यांनी केला.
सत्यधर्म लीनता ती रेंणू ।
सदा सासी बोलंणू ।
हर वातेनं सोच समजण केवंणू ।
भवसागर पार कर लेंणू ।
म्हणजेच सत्य हाच खरा धर्म आहे, त्यामुळे जीवनभर सत्याचेच आचरण करावे. समजून उमजून घेऊनच बोलावे. सर्वांशी नम्रतापूर्वक वागावे. असे वागलात तर तुम्ही हा जीवन रूपी भवसागर सहज पणे तरून जाल, अशी शिकवण ते समाजाला देत असत.
जे कपट वाचा लेन आये
पाप ओरे सोबत जाये ।
यम घरेरो फासो ओरे गळेमं पडीये ।
नव मंणेरी काया ओरी नरकेम मळणाये ।
लक्ष चौऱ्यांशी योनी भोगाये ॥
बेईमानी करून कपटाने दीन दुबळ्यांचा छळ करणाऱ्या दुर्जनांना सेवालाल महाराज वरील शब्दात ताकीद देतात. कपटनीतीचा वापर करून सज्जनांना धोका देणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या ठगांना नरकात जाण्याची व चौर्यांशी लक्ष योनी भटकत रहाण्या विषयी चेतावणी देतात.
चोर व लुटारू माणसांमुळे समाजात अशांतता पसरते, मेहनती चारित्र्यवान व नीतीवान लोकांचीच समाजाला खरी गरज असते.
हत्या करण्या सोबतच काया, वाचा व मनाने इतरांचा द्वेष करणे ही सुद्धा हिंसाच आहे.
गाय भाकड झाली तरी कसायाला विकू नका.
देवी आपली आईच आहे.
ती कधीच आपल्या मुलांवर कोपत नाही. तिला प्रसन्न करण्यासाठी कोंबडया, बकऱ्यांचा बळी देऊ नका.
बेल फूल वाहून आणि गोड शिऱ्या चा प्रसाद( नैवेदय) देऊन देवीला प्रसन्न करा, असा संदेश सेवालाल महाराज देतात.
तम सौता तमारे जीवनमं
दिवो लगा सको छो।
कोई केनी भजो पुतो मत।
कोई केती कमी छेनी।
सौतर वळख सौता करलीजो
करंणी करेर शिको,
नरेर नारायण बंन जायो।
जाणजो छाणजो,
पछच मानजो ।
स्वतःच्या उपजत क्षमतेवर विश्वास ठेवा. माझ्याच्याने काहीच होऊ शकत नाही हा न्यूनगंड मनी बाळगू नका. कोणीतरी येईन व माझे कल्याण करेल या आशेवर जगू नका. तुम्ही स्वतःच स्वतःचे जीवन प्रकाशमान करा.
नराचा नारायण होण्याची क्षमता तुमच्या प्रत्येकात आहे. एखादी गोष्ट संपूर्णपणे जाणून घ्या, तपासून घ्या व मगच ती माना, अंधानुकरण करू नका. अशी मोलाचा सल्ला ते सर्वांना देतात.
अनेक कुप्रथा नष्ट करण्यासाठी सेवालाल महाराज जीवनभर झटले.
दारु बंदी, पशुहत्या बंदी, स्त्रियांना अधिकार, भूतदया व निसर्ग प्रेमाची शिकवण त्यांनी सर्व समाजाला दिली.
शिका छ ।
शिकवा छ ।
शिकण राज घडावा छ ।
असा संदेश देत त्यांनी भारत भर भ्रमण केले.
त्याकाळी त्यांच्या नेतृत्वा खाली दिल्ली इथे भरलेल्या सर्व जातींच्या पंचायती मध्ये त्यांनी सर्व समाजासाठी अनेक सुधारणा सुचवल्या.
बंजारा समाज हा काही प्रमाणात इतर धर्मातही विखुरलेला होता.
तो त्यांनी एक संघ पणे हिंदू धर्मात आणला.
अशिक्षित असूनही, त्यांचा दृष्टिकोन दूरदर्शी व बुद्धि प्रामाण्यवादी होता.
गोरमाटी भाषा अजून ही
छापील स्वरूपात उपलब्ध नाही. त्यामुळे सेवालाल महाराजांच्या सर्व रचना जतन करून न ठेवल्याने
तो अनमोल ठेवा पूर्ण स्वरूपात आपल्या पर्यंत पोहचू शकला नाही.
मात्र त्यांचे समाज प्रबोधनाचे कार्य इतर सर्व संत
मांदीयाळीच्या तोडीचे आहे यात काहीच दुमत नाही.
एकंदरित सर्व मानवजाती साठी मागण मागताना ते म्हणतात,
वाडी वस्तीनं सायी वेस ।
किटी मुंगीनं सायी वेस ।
जीव जण गाणीनं सायी वेस ।
बाल बच्चानं सायी वेस ।
सेनं सायी वेस…
या सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचे, वाडी- वस्त्यांचे, किड्या- मुंग्यांचे रक्षण कर अस मागण ते देवी मातेला मागतात.
आई तुळजा भवानीचे ते निस्सीम भक्त होते.
अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाशी नात सांगणारी ही सेवालाल महाराजांची रचना आहे. आपल्या रचनांमधून व कार्यातून आयुष्यभर मानवतावादाची शिकवण त्यांनी सर्व समाजाला दिली.
पौष शुक्ल पक्ष मंगळवार दि.2 जानेवारी 1806 रोजी रुईगड ता. दिग्रस जि. यवतमाळ इथे त्यांनी समाधी घेतली.
या समाज क्रांतीकारी युगपुरुषास माझे विनम्र अभिवादन.
जय सेवालाल!
… सोमनाथ माळी
सोशल मिडिया महामित्र,
महाराष्ट्र शासन






