कै.रामराव जिभाऊ पाटील अन्नपूर्णा योजना म्हणजे शेतकऱ्यांप्रती आपली कृतज्ञता – आमदार मंगेश चव्हाण
शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून काम करण्याचा सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा निर्धार
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कै.रामराव जिभाऊ अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ
शेतकऱ्यांना मिळणार १० रुपयात दर्जेदार भोजन,
माजी मुख्यमंत्री कै.वसंतरावजी नाईक सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन
मनोज भोसले
चाळीसगाव – जगाचा पोशिंदा म्हणवला जाणारा बळीराजा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे, मात्र आज आपण बघतो की अस्मानी – सुलतानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आहे. यावर्षी तर हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला, जगाला अन्नधान्य पुरविणारा बळीराजा मात्र स्वताच्या हक्काच्या बाजार समितीत उपाशी पोटी राहता कामा नये, यासाठी शेतकऱ्यांना अल्पदरात चांगल्या दर्जाचे भोजन मिळावे अशी घोषणा आपण निवडणुकीत केली होती. आज दिलेला शब्द पाळत नवीन सभापती – उपसभापती व संचालक मंडळाने कै.रामराव जिभाऊ पाटील यांच्या नावाने अन्नपूर्णा योजना सुरु केली. ही योजना म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार नसून त्यांच्याप्रती असलेली आपली कृतज्ञता यामाध्यमातून आपण व्यक्त करत आहोत, आणि खऱ्या अर्थाने हीच कै.रामराव जिभाऊ व कै.उदेसिंग आण्णा यांना श्रद्धांजली ठरेल. सोबतच इथे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आपण हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या नावाने कृषी वाचनालय देखील आजपासून सुरु केले आहे. त्याचादेखील लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कै.रामराव जिभाऊ पाटील अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी १० रुपयात भोजन शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार साहेबरावजी घोडे, सभापती सरदारशेठ राजपूत, उपसभापती किशोर पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस पोपटतात्या भोळे, महिला आयोग सदस्या सौ.देवयानीताई ठाकरे, न.पा.गटनेते संजय रतनसिंग पाटील, प्रदेश पदाधिकारी उद्धवराव महाजन, सं.गा.यो तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, माजी जि प सदस्य शेषराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, नगराध्यक्ष पती विश्वास चव्हाण, माजी सभापती रविंद्र चुडामण पाटील, माजी उपसभापती महेंद्र पाटील, संचालक रोहिदास लाला पाटील, मच्छिंद्र राठोड, विश्वजित पाटील, धर्मा खंडू काळे, कल्याणराव पाटील, सौ.शोभाबाई आबा पाटील, सौ.अलकनंदा धर्मराज भवर, प्रकाश पाटील, जितेंद्र वाणी, शिरीषकुमार जगताप, रमेश गोविंदा चव्हाण, माजी पं स सदस्य दिनेश बोरसे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुरेश स्वार, चंदू तायडे, बापू अहिरे, सुधीर पाटील, प्रा.ए.ओ.पाटील, अविनाश चौधरी, शिवसेना शहरप्रमुख नानाभाऊ कुमावत, बाळासाहेब राउत, खलाणे, दिलीप गवळी, कपिल पाटील, धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, प्रभाकर चौधरी, अमोल चौधरी, किशोर गवळी, राम पाटील, यांच्यासह विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विकासो चेअरमन, आडत-हमाल – मापाडी संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सम्राट बळीराजा, स्व.जिभाऊ, स्व.उदेसिंग आण्णा यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. योजनेचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते भावसिंग काळू पाटील या जेष्ठ शेतकऱ्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करून करण्यात आला.
आपल्या उद्घाटनपर मनोगतात आमदार मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते स्व.रामराव जिभाऊ यांच्या कुशल अश्या नेतृत्वाखाली चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाली. त्यांच्या काळापासूनच जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक अग्रगण्य बाजार समिती म्हणून चाळीसगाव बाजार समितीची ओळख निर्माण झाली, सहकारमहर्षी कै. आण्णासाहेब उदेसिंग पवार यांनी सलग २९ वर्ष मार्केट कमिटीचे सभापती पद भूषवले, यासह अनेक मान्यवरांनी आपापल्या कार्यकाळात मार्केट कमिटीची धुरा यशस्वीपणे सांभाळली, ही परंपरा यापुढे देखील कायम ठेवण्याची जबाबदारी आपली आहे.
ऑगस्ट २०१५ मध्ये मार्केट कमिटीची निवडणूक होऊन भाजपा – सेना प्रणित सहकार पॅनल भरघोस मतांनी विजयी झाले. मार्केट कमिटीचे सभापती रविआबा व उपसभापती महेंद्रबापू व सर्व संचालक मंडळाच्या प्रयत्नाने कांदा मार्केट सुरु करण्याचा ऐतिहासिक निर्णय या काळात घेतला गेला. २०१५ मध्ये १२ लाख शिल्लक असलेली बाजार समिती आज 1 कोटी शिल्लक मध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी सरदार शेठ यांच्या कार्यकाळात असरदार काम होईल, यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करणार असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून निवडणूक काळात दिलेला शब्द नूतन सभापती व उपसभापती यांनी शब्द पूर्ण केला त्याबद्दल अभिनंदन केले. येणाऱ्या काळात अश्याच रीतीने बाजार समितीची वाटचाल शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सुरु राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तळेगाव, मेहुणबारे व वाघळी येथे उप बाजार सुरु करणार – सभापती सरदारसिंग राजपूत
चाळीसगाव तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा तालुका असून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत येत्या काळात चाळीसगाव तालुक्यातील नांदगाव, धुळे, पारोळा व भडगाव – पाचोरा येथील बाजार समितीत तालुक्याच्या सीमेवरील शेतकऱ्यांचा जाणारा शेतीमाल तालुक्यातच वळविण्यासाठी तळेगाव, मेहुणबारे व वाघळी येथे उप बाजार सुरु करणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सरदारसिंग राजपूत यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगतात उपसभापती किशोर भिकनराव पाटील बाजार समितीच्या कामाचा आढावा दिला, निवडणुकीला सामोरे जाताना शेतकऱ्यांना अल्पदरात जेवण देण्याचे आश्वासन दिले होते, ते आम्ही पूर्ण करत असून मागील सभापती – उपसभापती यांच्या कार्यकाळात सुरु झालेल्या कांदा मार्केट मुळे आज बाजार समितीची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे, येणाऱ्या काळात भाजीपाला मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स व काँक्रीटीकरणं करणार असल्याचे सांगितले.
माजी सभापती रविंद्र चुडामन पाटील यांनी आपल्या मनोगतात आधीच्या संचालक मंडळाने कांदा मार्केट साठी जागा उपलब्ध केल्याने आम्ही नाशिक जिल्ह्याच्या तोडीचे कांदा मार्केट उभे सुरु करू शकलो, सदर योजना मार्केट कमिटीचा एक रुपया न घेता आमदारांच्या व सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु झाली असल्याचे सांगत बाजार समितीच्या विकासासाठी सर्व पक्षीयांच्या योगदानाचा उल्लेख केला.
माजी उपसभापती महेंद्र पाटील व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम यांनी यांनी सहकारात राजकारण न करता सर्वांनी एकदिलाने पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एक होण्याचे आवाहन केले तसेच बाजार समितीत शासनाच्या शिवभोजन योजनेंतर्गत प्रस्ताव शासनाकडे पाठवू, यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यमान संचालक व माजी सभापती रोहिदास लाला पाटील –यांनी योजनेचे कौतुक करताना चाळीसगाव बाजार समितीचे व्यवहार हे जिल्हयातील सर्वात पारदर्शक व्यवहार असल्याने आज नावलौकिक टिकून आहे, शेतकऱ्यांच्या हिताच्या बाबतीत चांगला पायंडा सर्वांनी पुढे सुरु ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.
१ मार्च पासून तालुक्यातील नदी व नालाखोलीकरण साठी ११ पोकलेन मशीन…
बाजार समिती संचालक कल्याण पाटील सर यांनी मनोगतात दिलेला शब्द पाळल्याबद्दल आमदारांचे आभार मानले, राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांसाठी एक होऊन काम करू, आमदारांनी जर शेतकऱ्यांना नदी नालाखोलीकरण करून देत शेतकऱ्यांच्या शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून दिले तर तेच शेतकरी संचालक मंडळाला घरून जेवणं घेऊन येतील, त्यांना १० रुपयात जेवण देण्याची वेळ येणार नाही इतके ते सक्षम होतील असे मत व्यक्त केले. हाच धागा पकडत आमदार मंगेश चव्हाण यांनी बोलणे कमी आणि काम जास्त असा माझा स्वभाव असून पाणी या विषयावर तालुक्यातील जलमित्रांची व तज्ञांच्या मदतीने माझ्या शिवनेरी फौंडेशन मार्फत भूजल अभियान – मिशन ५०० कोटी लिटर्स जलसाठा यावर काम सुरु झाले असून येत्या १ मार्च रोजी ११ पोकलेन मशीन तालुक्यातील नदी – नाला खोलीकरण यासाठी पूर्णवेळ उपलब्ध करून देत असल्याची घोषणा आमदार चव्हाण यांनी केली. सोबतच येत्या शिवजयंतीच्या मुहूर्तावर अद्ययावत व सुसज्ज असे सोई सुविधायुक्त संपर्क कार्यालय उद्घाटन करत असून जनतेच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी याठिकाणी सोडविल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.






