?️ अमळनेर कट्टा…एकविसाव्या शतकात म्हणजे विज्ञान युगात अमळनेरात अंधश्रद्धेचा धूर..! डॉ. संग्राम पाटील यांचे मंगळाला हटके फटके
अमळनेर नुकतेच अमळनेर येथील मंगळ मंदिरात कोरोना हटाव साठी होम करण्यात आला. तसे पाहिले तर अमळनेर पूज्य साने गुरुजींची कर्मभूमी..ह्या भूमीत कितीतरी पुरोगामी विचारसरणी कार्यकर्ते घडले..राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन नाचे कार्य जोरात सुरू होते..आजही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अमळनेरात आहेत..पण सदर प्रकार पाहून एकही व्यक्ती बोलला नाही किंवा विज्ञान युगात ह्या गोष्टी आपण कसे करू शकतो यावर आवाज ही कुणी उठविला नाही…मात्र जेष्ठ विचारवंत संग्राम पाटील यांनी मात्र मंगळाला चांगलेच फटके सोशल मिडिया द्वारे दिले आहेत…
#DigambharMahale
महाले सर, माझ्या माहितीप्रमाणे आपण शिक्षक होतात. विशेषतः बहुजन समाजातून आपण अत्यंत मेहनतीने शिक्षण क्षेत्रात चांगलं योगदान दिलंय असं मी ऐकून आहे. पण माझा पुढील मुद्दा वाचावा आणि गांभीर्याने विचार करावा
मी देखील तुमच्यासारखाच खेड्यातून आलोय पण आज अनेक जागतिक घडामोडींबद्दल जागरूकता मी राखतो. विज्ञान आणि विवेक ह्यांना प्राधान्य देतो. शिवराय फुले शाहू आणि बाबासाहेबांनी हाच वारसा आपल्याला दिलाय.
मंगळ गुरु शनी हे पृथ्वीसारखेच ग्रह आहेत, सूर्य तारा आहे, चंद्र उपग्रह आहे, राशी नक्षत्र या बाबी काहीही दैवी नाहीत, आपण त्यांच्या नावाने आपल्या पूर्वजांनी गैरसमजातून जे चुकीचं केलं ते आता ताबडतोब सोडावं. मंगळ मंदिरा ऐवजी तारांगण काढून लोकांना सायन्स शिकवावं. अशा मंदिरातून हवन वगैरे सारख्या बुरसट कर्मकांडांचा प्रचार करने कितपत विवेकी आहे, हे पाखंड करोना काळात पसरवणे हा मानवते विरोधातील अक्षम्य गुन्हा आहे. बाकी सामाजिक कामं करायला मंगळाला देव म्हणून मंदिर आणि कर्मकांड करण्याची काय गरज, एक सामाजिक संघटन म्हणून करायला काय हरकत आहे.
दैववादात लोकांना अडकवणे हे आज योग्य नाही, माझ्या पोस्टमधलं प्रकरण मंगळाचे असो की कुठलेही हे चुकीचेच आहे. अशा दैववादाने भारतीय जनतेचे अतोनात शोषण झालेलं आहे आणि आजही सूरु आहे. विशषता महिला आणि बहुजनांचे शोषण यातून होते. त्यामुळे पोस्टमधील मुद्दा काहीसा वेगळा असला तरी होम हवन आणि करोना निर्मूलन हे दैववाद सोडून बाकी काही नाही. जगातल्या प्रचंड प्रदूषणाने virus गेला नाही आणि हवन आणि मंत्रांनी जाईल अशी अंधश्रद्धा बाळगणे शिकलेल्या समाजाला शोभणारी नाही. साने गुरुजींच्या अमळनेर मधून असलं बुरसट प्रकरण प्रसारित व्हावं हे लांछनास्पद आहे. आज जग कुठे गेलंय आणि आपण काय करतो आहोत याची जाणीव आपल्याला व्हायलाच हवी, पुढच्या पिढ्याना काय सांगणार आपण? आम्ही करोना निर्मूलन साठी हवन, शेण, गोमूत्र, गायंत्रि मंत्र, कुरान गीता बायबल असले उद्योग करत होतो म्हणून?






