? कोरोना अपडेट..साहेब धान्य..द्या हो धान्य!…रेशन द्या रेशन…!नग्न व्यवस्थेचं भयानक वास्तव..रेशन
क्रमशः
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर
- ओ भाऊ माले रेशन दे रे…ओ साहेब माले तांदुय, गहू जोयजेत साहेब घरं मा पोरे,आंडॊर, आंडेरी,नातू,पन्तु गैरी मोठी फाईमेली शे खावाले काई नई… काय करो..
- साहेब आमची नावे ऑनलाइन झालीच नाहीत..आम्ही दोन वर्षांपूर्वी दिलं होतं प्रकरण…
- साब हमको रेशन नहीं मिलता.. बहोत दिनों से दुकानदार बोला हैं… ओ अनसुनी कर देता हैं…..
- साहेब माझं नाव या दुकानात आहे आणि ऑनलाईन दुसऱ्या दुकानात नाव आहे.. मी काय करू ? मला दोन्ही रेशन दुकानदारांनी हाकलून दिलं…
रेशन दुकानांवरील लांबच लांब रांगा…कोणी नं वर पिशवी ठेवली तर कोणी पाण्याची बाटली…
मोलकरणी, मजूर,कामगार,हात गाडीवाले,छोटे छोटे व्यवसाय करणारे लाखो हात रिकामे…हाता तोंडाची मिळवणी कठीण…
केशरी कार्ड धारकांच्या अनेक समस्या …समज गैरसमज… पोटाची खळगी भरण्यासाठी उन्हा तान्हात म्हातारे,कोतारे, सुरकूतलेले हात पाय, चेहरे,कोणी डोक्यावर पदर घेऊन तर कोणी कमरेवर हात ठेवून झाशीची राणी बनून हक्का साठी पोटासाठी लढणारी मर्दानी….कोणी न बोलता येणारे तर कोणी कुबड्या टेकत वितभर पोटासाठी रणरणत्या उन्हात रेशनची दुकानदारांची देवा सारखी वाट पाहणारे असंख्य डोळे…एकच आस रेशन केंव्हा मिळेल?
हातमजुरी करणारे,रोजंदारीवर जीवन जगणारे,लाखो थांबलेले हात. पोट भरण्याची धडपड … कोणी तरी शिजलेलं अन्न देत आहे तर कोणी कच्चा किरणा तोही अपूर्ण आणि किती दिवस लावून लावून पुरविणार? शिजलेलं अन्न निकृष्ट दर्जाचे आणि कच्चा किराणा अपूर्ण…

गेल्या चार दिवसांपासून सतत रेशन दुकान,रेशनकार्ड धारकांच्या समस्या, प्रश्न,जाणून घेताना अंगावर काटा आणणारी परिस्थिती!
अर्धवट माहिती,दुकान कुठे तर रहिवास कुठे? घरा पासून दोन दोन की मी अंतरावर रेशन दुकान..सकाळी लवकर उठून सहा वाजे पासून रांगेत नं…
दुकानदार चिडलेला,वैतागलेला…उद्धट उत्तरे देणारा…समजून न सांगता अंगावर खेकसणारा..तो ही मजबूर…इतक्या कामांची सवय नाही अचानक अंगावर पडलेला बोजा!
कोणाला कोणाचीच पडलेली नाही..गरीब ,गरजू उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर उतरले आहेत..धनदांडगे ए सी त बसून कोरोना अपडेट पाहत आहेत… रामायण महाभारताचा आस्वाद घेतला जात आहे.कोरोनाने सर्वांच्याच चेहऱ्यावरील पडदे हटविले आहेत.
संपूर्ण देशातच नव्हे तर महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन च्या पार्श्वभूमीवर वरील परिस्थिती काहीच न सांगता देखील अत्यन्त बोलकी आहे..अंगावर शहारे आणणारी असून प्रत्येक जण गरजूंची परिस्थिती न पाहता गरम तव्यावर आपली पोळी कशी भाजून घेता येईल ह्याच नादात आहे..
याच धर्तीवर क्रमशः आपल्या समोर देशाच्या नग्न वास्तवतेच चित्रण करण्याचा प्रयत्न करणार आहे.. भग्न विचार ,नग्न व्यवस्था आणि ग्राउन्ड रियालिटी चे विदारक चित्र खूप अस्वस्थ करणारे आहे ते अनुभवूनच आपल्या समोर येणार आहे!






