स्वेरीतून उत्तीर्ण झालेल्या वैभव सातपुते यांची इंजिनिअर्स इंडिया लीमिटेडमध्ये गेट परीक्षेद्वारे निवड
वार्षिक पॅकेज १५ लाख रुपये
रफिक अत्तार
पंढरपूर- स्वेरीतून पदवी मिळविलेल्या व गेट परीक्षेत उत्तम मार्क मिळविलेल्या विद्यार्थ्यास १५ लाखांचे पॅकेज मिळाले. येळवी (ता.जत, जि. सांगली) येथील मुळ रहिवासी असलेले वैभव रत्नाकर सातपुते सन २०१८ रोजी स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगमधून उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांची गेट परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले या गेट परीक्षेच्या मार्कावर इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली नियंत्रण असलेल्या कंपनी (पी.एस.यु.) मध्ये निवड झाल्यामुळे स्वेरीतून उत्तीर्ण होणाऱ्या नूतन अभियंत्यांमध्ये उत्साह पसरला असल्याचे दिसून येत आहे.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली स्वेरीने शैक्षणिक क्षेत्रातील प्रवेश संख्या असो, वार्षिक परीक्षेचा निकाल असो, विद्यापीठात गुणवत्तेची आघाडी असो शैक्षणिक विभागातील प्रत्येक क्षेत्रात आघाडी नोंदविण्याचा जणू विडाच स्वेरीने उचलला की काय असे वाटते. अभियांत्रिकीच्या स्थापनेपासून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र अशा कॅम्पस प्लेसमेंट विभागाची सोय केली असून दुसऱ्या वर्षापासून याची तयारी करून घेतली जाते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांच्या नेतृत्वखाली स्वतंत्र उच्च शिक्षकांच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांचे चांगल्या कंपनीत प्लेसमेंट होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष गेस्ट लेक्चर, इंगजी संभाषण कौशल्य आणि कंपनीसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या बाबी यांची तयारी नियमित करून घेतली जात आहे. प्लेसमेंटमध्येही आपला विद्यार्थी अग्रेसर राहावा म्हणून यामध्ये शिक्षक वर्ग सातत्याने प्रयत्न करत आहेत. तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, रात्र अभ्यासिका हे सर्व स्वेरीत नियमित करून घेतले जाते. त्यामुळेच स्वेरीमध्ये आलेल्या कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करतात. गेल्यावर्षी जवळपास आठ लाख 80 हजार पॅकेज होते यंदा त्याचेही रेकोर्ड स्वेरीतून उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याने मोडीत काढले असून वैभव सातपुते याना पंधरा लाखांच्या पॅकेज वर काम करण्याची संधी मिळाली आहे. वैभव सातपुते यांनी या यशाचे श्रेय नियमित राबवीत असलेल्या रात्र अभ्यासिकेला व अभ्यासाठी स्वेरीत केला जाणारा नियमित पाठ पुरावा याला दिले आहे. वडील शेतकरी असल्यामुळे लहानपणापासून वैभव हे गरिबीत वाढले व गरिबीची जाणीव ठेवून रात्रंदिवस परिश्रम घेतले. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत येळवी येथे घेतले, माध्यमिक शिक्षण श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल, येळवीमधूनच पूर्ण केल्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी एस.जी.बी. महाविद्यालय जतमधून पूर्ण केले. त्यानंतर सन २०१५ साली स्वेरीतील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात कॅप राउंड मधून निवड झाली. स्वेरीतील वातावरण अभ्यासपूर्ण असल्यामुळे प्रत्येक वर्षी गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे वैभव यांना सोपे झाले. अभियांत्रिकीमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरमधील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात गुणवत्ता यादीत दुसरे स्थान मिळविले. त्यानंतर काही काळ स्वेरी अंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरींगमध्ये ज्ञानदानाचे कार्य देखील केले. पुढे शैक्षणिक अनुभव घेत असतानाच वैभव सातपुते यांनी गेट परीक्षेच्या माध्यमातून पंधरा लाखांचे वार्षिक पॅकेज मिळविले. हे पॅकेज मिळविताना स्वेरी कॅम्पस मधील अभ्यासाच्या व शिस्तीच्या वातावरणाचा खूप फायदा झाल्याचे सातपुते यांनी आवर्जून सांगितले. त्याचबरोबर अभियांत्रिकीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी गेट परीक्षा द्यावी. त्याचा भविष्यात होणारा फायदा याबाबत सविस्तर सांगितले. यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तीनही महाविद्यालयांचे प्राचार्य, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, प्रा. सचिन खोमणे, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी वैभव सातपुते यांचे अभिनंदन केले आहे.
छायाचित्र- वैभव रत्नाकर सातपुते.





