Pune

इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रणाचा निर्णय क्रांतिकारक – हर्षवर्धन पाटील

इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रणाचा निर्णय क्रांतिकारक – हर्षवर्धन पाटील

दत्ता पारेकर पुणे

पुणे : भारत सरकारने इथेनाॅलचा पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रणाचा निर्णय जाहीर केला आहे. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2023 पासून होणार आहे. या निर्णयामुळे देशातील साखर उद्योगाला बळकटी प्राप्त होणार असून अतिरिक्त साखर उत्पादनावर नियंत्रण ठेवता येणार आहे. साखर उद्योगाच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे शुक्रवारी (दि.4) केले.
भारत सरकारच्या राजपत्रात पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाची यासंदर्भातील अधिसूचना दि. 2 जून 2021 रोजी प्रसिद्ध झाली आहे, अशी माहितीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, सध्या पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल हे मिसळण्यात येत आहे. तेल कंपन्यानी चालू वर्षी 500 कोटी लिटर इथेनॉलचे टेंडर काढले असून आजपर्यंत साखर कारखान्यांनी सुमारे 325 कोटी लिटर इथेनॉल चा पुरवठा केला आहे. साखर कारखान्यांकडून ऑक्टोबरपर्यंत इथेनॉलची निर्मिती सुरू राहील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
केंद्र सरकारने 20 टक्के मिश्रणासाठी दीड वर्षाचा कालावधी हा नियोजनपूर्वक ठेवला आहे, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, प्रारंभी इथेनॉल मिश्रणास 2 टक्के मान्यता होती, नंतर 5 टक्के पुढे 10 टक्के झाली. आता टप्प्याटप्प्याने सध्याचे इथेनॉलचे 10 टक्के मिश्रणाचे प्रमाण वाढविले जाऊन ते 1 एप्रिल 2023 रोजीपासून 20 टक्के केले जाईल. त्यामुळे दर वर्षी 1000 कोटी लिटर इथेनॉलची तेल कंपन्यांकडून मागणी होईल, इथेनॉलला चांगले दर मिळत आहेत. याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होऊन पेट्रोलचे वाढते दरही आटोक्यात येण्यासही मदत होणार आहे, शिवाय देशाच्या परकीय चलनात बचत होण्यास मदत होईल,असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
देशात 5 कोटी तर महाराष्ट्रात 40 लाख शेतकरी ऊसाचे पिक घेतात. साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे 50 ते 60 हजार कोटींची झाली आहे. गेली 3 वर्षे अतिरिक्त उत्पादनामुळे साखर शिल्लक राहत आहे, त्यामुळे साखर उद्योग सध्या अडचणीत आला आहे.
ते पुढे म्हणाले, महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात 65 व खाजगीत 45 इथेनॉल प्रकल्प आहेत.आगामी काळात या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने योजना आखली आहे. त्यामुळे सुमारे एकूण 10 ते 15 टक्क्यापर्यंत साखरेचे उत्पादन हे इथेनाॅलकडे वळविले जाईल. त्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनाची अडचण दूर होण्यास मदत होईल. दरम्यान, आगामी 2021-22 हंगामासाठी ऊस पिकाखालील क्षेत्र वाढलेले असून ते 11.50 लाख हे. एवढे झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त साखर उत्पादनास इथेनॉल निर्मिती हाच एकमेव पर्याय असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी शेवटी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button