उसनवारीच्या पैश्याच्या वादातून झाडी येथे एकास मारहाण, मारवड पोलिसात तक्रार दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील झाडी येथे एकास मारहाण केल्या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी विनोद लोटन पाटील यांनी गावातील प्रकाश अर्जुन पाटील यांना ९० हजार रुपये उसनवार दिले होते. हा व्यवहार प्रकाश पाटील यांचे भाऊ अशोक पाटील यांच्या समक्ष झाला होता. पैसे उसनवार असे पर्यंत प्रकाश पाटील यांचे शेत फिर्यादीस कसण्यासाठी दिले होते. त्यानंतर त्यांनी ८० हजार रुपये परत केले त्यावेळी फिर्यदिने शेत त्यांच्या ताब्यात दिले. आठ दिवसापूर्वी फिर्यादी ने राहिलेल्या दहा हजार रुपयांची मागणी केली असता प्रकाश पाटील यांनी तुझे माझ्याकडे काहीच पैसे बाकी नाही, यापुढे माझ्याकडे पैसे मागू नको असे सांगितले. दि. २६ रोजी दुपारी २:३० वाजता फिर्यादी घरी असताना सागर प्रकाश पाटील व बापूजी अशोक पाटील हे दोघे घरी आले व पैसे का मागितले म्हणून मारहाण केली. अश्यावेळी फिर्यादीची पत्नी व गल्लीतील लोकांनी त्यांची सोडवणूक केली. सदर फिर्यादीवरून सागर प्रकाश पाटील व बापूजी अशोक पाटील या दोघांविरुद्ध मारवड पोलिसात भादवि कलम ४५२, ३२४, ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना सचिन निकम करीत आहेत.






