व्हीएसआयच्या ऊस प्रदर्शनास इंदापूर तालुक्यातील शेतकरी,विद्यार्थी भेट देणार
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
मांजरी बु.(पुणे ) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शुक्रवारी जागतिक साखर परिषद सुरु झाली आहे. सदरची ऊस परिषद रविवार दि.2 फेब्रु. पर्यंत चालणार आहे. या कालावधीत जागतिक ऊस परिषदेच्या निमित्ताने होणाऱ्या जागतिक ऊस पीक प्रदर्शनास इंदापूर तालुक्यातील महिला तसेच शेतकरी व विद्यार्थी हे मोठ्या संख्येने भेट देणार आहेत.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिलचे संचालक व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार इंदापूर तालुक्यातून महिलांसह शेतकरी व विद्यार्थी हे मांजरी बुद्रुक येथील प्रदर्शनाला भेट देणार आहेत.नीरा-भीमा व कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील महिलांसह शेतकरीही जाणार आहेत. तसेच बावडा येथील शहाजीराव पाटील कृषी तंत्रनिकेतचे विद्यार्थी त्याचप्रमाणे बावडा येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि नारायणदास रामदास विद्यालय इंदापूरचे पिक विज्ञानचे विद्यार्थी, इंदापूर कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विज्ञान पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी- विद्यार्थिनी सदर प्रदर्शनास भेट देणार आहेत. जागतिक स्तरावरील होणाऱ्या परिषदेची साखर व तत्संबंधी उद्योगातील वैविध्य,नावीन्यपूर्णता आणि शाश्वतपणा अशी संकल्पना असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

ऊस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, मिश्र पिक पद्धती, खत व्यवस्थापन यांची अद्यावत माहिती प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे. तसेच साखर उद्योगातील इंजिनिअरिंग मधील प्रक्रिया, अवजारे यांची माहितीही मिळणार आहे.तरी शेतकरी, विद्यार्थ्यांनी या ऊस पीक परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.






