Akkalkot

? *आगामी लोकसभा लढविणार नाही:- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे*

? *आगामी लोकसभा लढविणार नाही:- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे*

कृष्णा यादव, अक्कलकोट

प्रतिनिधी अक्कलकोट – आपण लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नवख्यांना संधी देणार असून येणारी पोटनिवडणूक मी लढविणार नसल्याचे सुतोवाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले. मात्र, कार्यकर्त्यांनी शिंदे यांनीच लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली आहे.

बुधवारी औज, तालुका दक्षिण सोलापूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात अनेक कार्यकर्त्यांनी खा. जयसिद्धेेश्‍वर महाराज यांचा जातीचा दाखला खोटा असल्याचे स्पष्ट झाल्याने आता सोलापूर लोकसभेसाठी पोटनिवडणूक लागणार असून या निवडणुकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी ही निवडणूक लढवावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्‍त केली होती.

मात्र, सुशीलकुमार शिंदे आपले मनोगत व्यक्‍त करताना त्यांनी आपण ज्येष्ठ असल्याचे सांगत आपण आता नवख्यांना संधी देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे अप्रत्यक्षपणे शिंदे यांनी आगामी लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी नकार दर्शविला आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढतीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. भाजपचे खा.डॉ. जयसिद्धेश्‍वर महाराज यांचा जातीचा दाखला बोगस असल्याचे निष्पन्‍न झाल्याने आता या जागेसाठी पोटनिवडणूक लागणार असून आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित मेळाव्यात शिंदे यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढविण्याची अपेक्षा व्यक्‍त केली. या मेळाव्याच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरच्या काँग्रेसचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी नव्या दमाची दक्षिण काँग्रेस कमिटीची टीम तयार केली आहे. या टीमकडून आता काँग्रेस पक्षाच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे हे उभारण्याआधी नकोच म्हणत असतात, पण ते उभारतील, असा विश्‍वास देखील या मेळाव्यानंतर काही कार्यकर्त्यांमध्ये रंगलेल्या चर्चेतून दिसून आला. अशाच पद्धतीचे आणखीन मेळावे तालुक्यात विविध ठिकाणी घेण्याचे नियोजन असल्याचे या मेळाव्याप्रसंगी सांगण्यात आले. एकूणच आगामी लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे दिसून येत आहे. सुशीलकुमार शिंदे यांनाच पुन्हा एकदा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना दिल्लीला पाठविण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत, मात्र शिंदे नवख्यांना संधी देणार असे म्हणत असले तरी शेवटी संधी कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button