आदिवासी विकास विभागाचे उपकार्यालय एरंडोल येथे करावे: बिरसा क्रांती दलाची मागणी.
रत्नागिरी : आदिवासी विकास विभाग कार्यालयाचे उपकार्यालय मध्यवर्ती ठिकाण एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगांव या ठिकाणी स्थापन करावे अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंञी अॅड. के.सी.पाडवी , आयुक्त आदिवासी विकास भवन नाशिक व प्रकल्प अधिकारी प्रकल्प कार्यालय एरंडोल जिल्हा जळगाव यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून फक्त आदिवासींची एकूण लोकसंख्या 6,50,000 इतकी आहे.या जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्प आहे,माञ ते यावल येथे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहे.आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी जळगांव जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण एरंडोल येथे उप कार्यालय स्थापन करण्यात यावे.यावल या ठिकाणी येण्यासाठी चाळीसगांव,पाचोरा,अमळनेर,जामनेर, धरणगांव,एरंडोल इत्यादी तालुक्यातील लोकांना अंतर लांब पडते व एका दिवसात येणे जाणे शक्य होत नाही, परिणाम कामासाठी सारखे सारखे जाणे येणे सामान्य आदिवासींना परवडणारे नाही. आदिवासी समाजाची काही बांधव हे मोल मजूरी करून जगणारे, विटभट्टी वर काम करणारे,रोजंदारीवर काम करणारे आहेत, त्यामुळे त्यांना यावल या ठिकाणी जाणे खर्चीक बाब आहे. शिवाय यावलपासून लांब असणार्या आदिवासी तालुक्यातच आदिवासीं लोकांची संख्या जास्त आहे. तेव्हा आदिवासींच्या या समस्येकडे लक्ष देऊन बिरसा क्रांती दल संघटनेच्या मागणीचा विचार करून आदिवासी विकास विभागचे उपकार्यालय एरंडोल जिल्हा जळगाव या मध्यवर्ती ठिकाणी तात्काळ सुरू करावे, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी शासनाकडे केली आहे.






