कुलुप तोडून चोरट्यांनी 30500 रुपये लंपास केले
औरंगाबाद :- गणेश ढेंबरे
वैजापूर शहरातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. चोरट्यांनी एकूण 30 हजार 500 रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना 16 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास वैजापूर शहरातील संतोषीमाता नगरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, भारत गायके हे वैजापूर शहरातील संतोषीमाता नगर परिसरात कुटुंबियांसह रहात आहे. शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी वैजापूर तालुक्यातील भिवगाव येथे त्यांची शेतजमीन असल्याने 10 ऑक्टोबर रोजी ते पत्नी व मुलांसह कापूस वेचणीसाठी गेले होते. गुरुवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास घराशेजारी राहणार्या जनार्थन काकडे यांनी भारत गायके यांना फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली.
त्यामुळे गायके व त्यांचे वडील वैजापूर येथे आले असता त्यांना घराचे कुलूप तोडून ते संरक्षण भिंतीवर ठेवलेले आढळून आले. तसेच घराचा दरवाजाही उघडा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात प्रवेश करून बघितले असता त्यांना कपाटाचे कुलूप तोडून त्यातील 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख 500 रुपये रक्कम चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी भारत गायके यांनी वैजापूर तालुक्यातील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






