मुख्याध्यापक संघाने गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील रहावे- हर्षवर्धन पाटील
दत्ता पारेकर पुणे
पुणे : इंदापूर तालुका मुख्याध्यापक संघामध्ये सुमारे 100 माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. शिक्षणामध्ये गुणवत्ता ही महत्वाची असल्याने मुख्याध्यापक संघाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्नशील रहावे , असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी केले.
बावडा येथे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेबद्दल प्राचार्य जी.एस.घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य जी.एस.घोरपडे हे श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या कुरवली येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील माध्यमिक व कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढीचे आव्हान आगामी काळात मुख्याध्यापक व शिक्षकांवरती असणार आहे, सदर आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी आतापासूनच मुख्याध्यापक संघाने करावी, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, सरपंच व सचिव किरण पाटील, प्रसाद पाटील, स्वप्निल घोगरे, संजय घोगरे, प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.






