स्मारक समितीत मात्तबर नेतेमंडळी, तरीही मिळेना पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या स्मारकाला निधी
सोलापूर : विद्यापीठाचा नामविस्तार झाल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हावी, म्हणून अध्यासन केंद्र उभारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. तो प्रस्ताव सरकारी दरबारी पडूनच आहे. दुसरीकडे विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आश्वारुढ स्मारक व्हावे, म्हणून राज्य सरकारने दीड कोटींचा निधी द्यावा, असे पत्र विद्यापीठाने पाठविल्याचे कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी सांगितले. मात्र, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑक्टोबरपर्यंत निधी मिळेल, अशी ग्वाही देऊनही अद्याप दमडाही मिळालेला नाही.
स्मारक समितीतील मात्तबर नेतेमंडळी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे वंशज भूषणसिंहराजे होळकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे या नेतेमंडळींचा स्मारक समितीत समावेश आहे, तर विद्यापीठातील व्यवस्थापन समितीचे सर्वच सदस्य, प्र- कुलगुरु डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, वित्त व लेखा अधिकारी तथा परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा हेही या समितीचे सदस्य आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे सामाजिक, पर्यावरण, राजकारण व अर्थकारणात मोठे काम आहे. त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्यावर संशोधन व्हावे, या हेतूने कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठात त्यांचे अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे तो प्रस्ताव राज्य सरकारला व विद्यापीठ अनुदान आयोगाला ऑनलाइन पाठविण्यात आला. त्यानंतर विद्यापीठात प्रशस्त असे आश्वारुढ स्मारक, गार्डन उभारणीसाठी अडीच कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सरकारकडून दीड कोटी रुपये दिले जातील. उर्वरित एक कोटींचा निधी विद्यापीठाने द्यावा, असे स्पष्ट केले. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन होईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, त्यानुसार काहीच कार्यवाही झाली नसल्याने विद्यापीठाने ऑक्टोबरअखेर सरकारला पत्र पाठवून निधीची मागणी केली आहे.
आराखडाही तयार नाही
अडीच कोटींचा खर्च करुन विद्यापीठाच्या एक-दोन एकर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे आश्वारुढ स्मारक उभारले जाणार आहेत. त्यात काय-काय गोष्टी असणार, यासाठी आक्टिेक्चर नियुक्त करुन आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठाने सरकारकडे बोट करीत निधीचे कारण पुढे केले आहे. निधी प्राप्त झाल्यांतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती व स्मारक समितीत तो अंतिम केला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत त्याला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर स्मारकाच्या कामाला सुरवात होईल, असे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आता ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहितेचा अडथळा असल्याने जानेवारीतच याबाबत बैठका होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.






