Dhule

?️ ब्रेकिंग..मुंबईला महामुक्काम आंदोलन; धुळ्यातून जाणार हजारो कार्यकर्ता

?️ ब्रेकिंग..मुंबईला महामुक्काम आंदोलन; धुळ्यातून जाणार हजारो कार्यकर्ता

धुळे : राज्यातील हजारो शेतकरी- कामगारांचे मुंबईत चार दिवस (ठिय्या) महामुक्काम आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी धुळे जिल्ह्यातून सत्यशोधक शेतकरी सभेच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्ते सहभागी होतील अशी माहिती संघटनेचे राज्य संघटक किशोर ढमाले, श्रमिक शेतकरी संघटनेचे सुभाष काकुस्ते यांनी दिली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आणखी निर्णायक टप्प्यावर घेऊन जाण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने देशभर २३ ते २६ जानेवारी या काळात सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राजभवनांवर आंदोलनाची हाक दिली आहे. तसेच १८ जानेवारी रोजी ‘किसान महिला दिवस’ देशभर साजरा करण्याची हाक दिली आहे. महाराष्ट्रातील विविध समविचारी किसान, कामगार संघटना तसेच सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येऊन या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शेतकरी, कामगार २३ ते २६ जानेवारी असे चार दिवस मुंबईत महामुक्काम आंदोलन करतील.

दीड हजार कार्यकर्ते

सत्यशोधक शेतकरी सभेचे दीड हजार कार्यकर्ते २३ जानेवारीला साक्री व धुळे येथे क्रांतिवीर तंट्या भिल व नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमांना अभिवादन करून, महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गाऊन मुंबईच्या दिशेने कूच करतील. यात ५०० महिलांचा सहभाग असेल असे संघटनेचे साक्री तालुकाध्यक्ष लालाबाई भोये ,सेक्रेटरी मिरूलाल पवार, संघटक जितेंद्र पवार, धुळे तालुकाध्यक्ष सुरेश मोरे,सेक्रेटरी रतन सोनवणे यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनीही २५ जानेवारीच्या आंदोलनात सामील होण्याचे मान्य केले असल्याचे काकुस्ते, ढमाले व मालचे यांनी म्हटले आहे.

असे असेल आंदोलन

१८ जानेवारीला ‘किसान महिला दिवस’, २३ जानेवारीला ट्रॅक्टरसह इतर वाहनांतून मुंबईच्या दिशेने कूच, २४ जानेवारीला आझाद मैदान येथे सर्वजण एकत्र येतील, २५ जानेवारीला दुपारी दोनला राज भवनाच्या दिशेने कूच, २६ जानेवारीला आझाद मैदान येथे राष्ट्रीय ध्वजवंदन होईल अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वंजी गायकवाड, जिल्हा सेक्रेटरी यशवंत मालचे, जिल्हा संघटक मन्साराम पवार व अशपाक कुरेशी यांनी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button