पावणे दोन वर्षांनी आरोपी बिट्या जेरबंद
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती – बारामती शहरातील कृष्णा उर्फ नाना महादेव जाधव यांच्या खून प्रकरणी फरार असलेला मोठा बिट्या उर्फ सचिन रमेश जाधव( वय-27,रा टकार कॉलनी,तांदुळवाडी वेस )याला बारामती शहर पोलिसांनी सोलापूर मधून अटक केली.तब्बल पावणे दोन वर्षानी बिट्या पोलिसांच्या हाती लागला.
शहरातील नेवसे रोड येथे रहाणारे कृष्णा जाधव ह्यांचा 5 नोव्हेंबर 2018 रोजी येथील बारामती हॉस्पिटलजवळ सपासप वार करत खून करण्यात आला होता. याप्रकरणी 21 जनाविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.आरोपींनी जाधव यांच्याकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.ती न दिल्याने कट रचून खून करण्यात आला होता.
घटनेदिवशी जाधव हे त्यांच्या चालक प्रभाकर पवार यांची भेट घेण्यासाठी बारामती हॉस्पिटल येथे होते. तेथुन बाहेर पडत असताना रिंगरोडनजीक धारदार हत्याराने त्यांच्या मानेवर,गळ्यावर, डोक्यात वार करत त्यांचा खून करण्यात आला होता.याप्रकरणी मयत कृष्णा यांची पत्नी सपना यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.त्यानुसार 21 जनाविरोधात गुन्हा दाखल झाला होता.आरोपीमध्ये चार अल्पवयीनाचा समावेश होता.या आरोपीविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियमांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल केला होता.गुन्ह्यातील 17 आरोपीना अटक करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र मोक्का न्यायालयात दाखल करून आरोपींना हजर केले होते.
आरोपीमध्ये समावेश असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दरम्यानच्या काळात बारामतीतच सांस्कृतिक केंद्रांनजिक सपासप वार करून खून करण्यात आला. मोठा बिट्या उर्फ सचिन रमेश जाधव हा या गुन्ह्यातील 11 वा आरोपी आहे.तो गुन्हा घडल्यापासून फरार होता.त्याने त्याकडील मोबाईल बंद करून इतर नातेवाईकाशी व मित्रांशी संपर्क बंद केला होता.तो सोलापूर शहरात सलगरवस्ती परिसरात राहत असल्याची सलगरवस्ती पोलीस ठाण्याला मिळाली होती.त्यांनी ही बाब बारामती शहर पोलीस ठाण्याला काळविल्यानंतर सोलापूर पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.जाधव याला मोक्का न्यायालयासमोर हजर करण्यात आले.त्याला सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याच्या विरोधात बारामती पोलीस स्टेशन मध्ये आठ गुन्हे दाखल आहेत.याप्रकरणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर अधिक तपास करीत आहेत.






