नीरा उजव्या, डाव्या कालव्यातील पाण्याचे होणार समन्यायी वाटप..मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: नीरा देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विनावापर राहणारे पाणी समन्यायी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नीरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
नीरा डाव्या कालव्यातून पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्याला 55 टक्के पाणी मिळणार आहे. तर उजव्या कालव्यातून सातार्या्तील खंडाळा, फलटण आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला तालुक्याला 45 टक्के पाणी मिळणार आहे. नीरा कालव्यातील या पाणी वाटपावरून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात संघर्ष निर्माण झाला होता. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकारण पेटले होते. या निर्णयाचेदेखील राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

नीरा देवघर धरणाचे काम सन 2007 मध्ये पूर्ण झाले. 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजीत लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणांत उपलब्ध होणारे पाणी मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे वाटप निरा डावा कालवा 55 टक्के व निरा उजवा कालवा 45 टक्के असे राहील. या निर्णयामुळे दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये समन्यायी तत्वावर पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. निरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुरंदर व बारामती, इंदापूर तालुक्यातील 37 हजार 70 हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळेल. तर निरा उजव्या कालव्याच्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांच्या 65 हजार 506 हेक्टर लाभक्षेत्राला फायदा होणार आहे.






