Kolhapur

राष्ट्रीय ज्यूदोपटू प्रथमेशची मृत्युशी झुंज अपयशी.

राष्ट्रीय ज्यूदोपटू प्रथमेशची मृत्युशी झुंज अपयशी.

सुभाष भोसले-कोल्हापूर
मैदानातील खेळात आपल्या दूर्दम्य इच्छाशक्तीने विजय मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी सराव कर तांना झालेल्या दुखापतीत नियतीपुढे हरलेल्या प्रथमेश निंबाळकर या तरुण खेळाडूचा जीवाला चटका लावणारा मृत्यू झाला.या घटनेने खेळ जगतासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय पातळीवर ज्यूदोच्या खेळात आपली वेगळी ओळख निर्माण करून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

फणसवाडी ता भुदरगड येथील ज्युदो खेळाडू प्रथमेश धनाजीराव निंबाळकर याचा सरावा दरम्यान झालेल्या दुखापतीने अपघाती निधनाने तालुक्यातील या खेळात पोकळी निर्माण झाली आहे. प्रथमेश निंबाळकर याचा जन्म 2003 साली शेतकरी कुटुंबात झाला.प्राथमिक शिक्षण गावात घेत असतानाच गावातील ज्युदो प्रशिक्षक अमोल देसाई यांच्याकडे तो ज्युदो चे धडे गिरवू लागला .प्रथमेश मधील जिद्द, चिकाटी आणि ध्येय अमोल देसाई या प्रशिक्षकाने ओळखून त्याला उत्तम दर्जाचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. या जोरावर त्याने प्राथमिक शिक्षण स्तरावरच तालुका,जिल्हा स्तर पार केला होता.पुढे त्याने अकरावी साठी मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात प्रवेश घेतला.दररोजचा सराव आणि व्यायाम यामुळे त्याच्या शरीरात वीज चमकावी अशी चपळता आली होती.

त्याने तालुका ,जिल्हा,राज्य पातळीवर पदकांची मांदियाळी जमवली होती. एक जोरदार फायटर म्हणून महाराष्ट्रातील खेळ जगतात त्याची वेगळी ओळख निर्माण झाली होती.ऑल इंडिया स्पर्धेत त्याने तीन पदके मिळवली होतीत तर खेलो इंडिया मध्ये एक सुवर्णपदक पटकावले होते.एव्हाना त्याची घौडदौड आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सुरू झालेली होती.पण नियतीच्या मनात काय दडलेले होते हे कोणालाही कळले नाही.
इंफाळ येथे १०ऑक्टोबर २०१९ ला होणाऱ्या स्पर्धेसाठी त्याची देशपातळीवर निवड झाली.ही स्पर्धा जिंकून ऑलम्पिकसाठी खेळायचं हे प्रथमेशचे स्वप्न होते.टप्प्यात येणारे स्वप्न पाहून तोही जीव तोडून मेहनत करू लागला.त्याच्या तयारीत कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये म्हणून अमोल देसाई आपले सगळे कसब पणाला लावून प्रशिक्षण देऊ लागले होते.शनिवारी (दि ५)ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता सराव सुरू झाला. अमोल देसाई हे मार्गदर्शन करीत होते. या सरावा दरम्यान प्रथमेशला जोरदार दुखापत झाली.त्याला कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया करावी लागणार असे सांगितले. घरची परिस्थिती बेताची पैशाचा प्रश्न निर्माण झाला. पण वडील धनाजीराव निंबाळकर आणि प्रशिक्षक अमोल देसाई यांनी समाजातील लोकांना मदतीसाठी साद घातली. या हाकेला समाजातील दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला.त्याची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडली. शस्त्रक्रिया झाल्यावर फेजिओथेरेपी दिल्याने तो लवकर बरा होऊ लागला.
तो बरा होतांना ” मला पुन्हा खेळायचं आहे !”असे सर्वांना सांगू लागला.त्याला दवाखान्यातून आठ दहा दिवसांनी बरे वाटू लागल्यावर घरी पाठवले.घरच्यांनी पुन्हा काही अडचण होऊ नये यासाठी त्याला कोल्हापूर येथेच ठेवले .दरम्यान शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी प्रथमेश ला सर्दी झाली आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला.त्याला श्वासोच्छ्वास करता येईना म्हणून दवाखान्यात दाखल केले.गेले तीन दिवस तो व्हेंटिलेटरवर होता.आज दुपारच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.एकुलता एक असलेल्या प्रथमेश च्या अपघाती निधनाने आई आणि वडील यांनी फोडलेला हंबरडा जीव पिळवटून टाकणारा होता.त्याच्या अंत्ययात्रेला तालुक्यासह जिल्ह्यातील खेळाडू आणि प्रशिक्षक उपस्थित होते.त्याच्या जाण्याने तालुक्यातील ज्युदो खेळात कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्याच्या पश्चात आजी,आई वडील,विवाहित बहीण असा परिवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button