10 हजार रुपये लाच घेताना पाटबंधारा लिपिकास अटक
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : बदलीचा अर्ज पुढे पाठवण्यासाठी पाटबंधारे विभागातील महिला सहायक अधीक्षक अभियंता तसेच वरिष्ठ लिपिकाने जालन्यातील लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वरिष्ठ लिपिक मनसुब रामराव बावसकर (५७) यास पैसे घेताना रंगेहाथ पकडले आणी अटक केली. तर सहायक अधीक्षक अभियंता संजिवनी गर्जे (५७) यांना हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, अटकेच्या भीतीने त्या फरार झाल्या.
दरम्यान, बावसकरला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जालन्याच्या पाटबंधारे विभागातील ३९ वर्षीय लिपिकाने काही दिवसांपूर्वी औरंगाबादला बदलीसाठी अर्ज केला होता. वर्ग एक पदावरील सहायक अधीक्षक अभियंता असलेल्या संजीवनी गर्जे यांनी या कामासाठी बावसकरमार्फत त्याच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केली. त्याने वारंवार विनंती करूनही गर्जेनी अर्ज पुढे सरकवला नाही.
अखेर पैसे देण्यास नकार देत जालन्याच्या लिपिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या दोघांची तक्रार केली. शनिवारी पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी यांनी स्नेहनगर मधील पाटबंधारे मंडळाच्या कार्यालय अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात चौकशी करून तक्रारीची खातरजमा केली. नंतर सापळा रचला. तक्रारदाराकडून आपल्या दालनातच दहा हजार रुपये घेताना बावस्कर यांना रंगेहाथ पकडण्यात आले.






