एरंडोल तालुक्यात अवैध गौण खनिज दंडात्मक कार्यवाहीसाठी तीन पथकांची नेमणूक,
उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांची माहिती.
प्रतिनिधी : रजनीकांत पाटील एरंडोल
एरंडोल : तालुक्यातील अवैध गौण खनिज दंडात्मक कारवाई करण्यासाठी संयुक्त पथक नेमण्यात आले आहे. वैजनाथ टाकरखेडा या वाळू गटासाठी नेमण्यात आलेल्या पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार एस.पी.शिरसाट यांच्यासह सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, उत्रान हनुमंत खेडे सिम वाळू गटासाठी नायब तहसीलदार आर.एस.जोशी हे पथक प्रमुख आहेत, त्यांच्या पथकात तलाठी, पोलीस कॉन्स्टेबल सह सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. खेडी कढोली ,रिंगणगाव ,दापोरी या परिसरासाठी मंडळ अधिकारी मुकेश जाधव यांचे पथक काम पाहणार आहे. नियुक्त करण्यात आलेली पथके दर महिन्याच्या एक व पंधरा तारखेला पंधरवाड्यात केलेले दौरे संबंधित गाव ठिकाणाचे पंचनामे फोटो व दंडात्मक कारवाई बाबत अहवाल प्रांताधिकार्यांकडे पाठवणार आहेत. या आदेशाचे पालन न झाल्यास त्याची गोपनीय अहवालात नोंद करण्यात येणार आहे/शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. विशेष हे की या पथका व्यतिरिक्त तहसील कार्यालयाकडून पूर्वी नेमण्यात आलेली पथके देखील अस्तित्वात राहतील. या संयुक्त कारवाई व्यतिरिक्त पोलीस विभाग ,महसूल विभाग यांनी स्वतंत्रपणे कारवाई सुरू ठेवावी असे सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान एरंडोल तालुक्यात गिरणा नदीपात्रातून वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाळू चोरीला पूर्णपणे आळा घालने आवश्यक असले तरी ते यंत्रणांच्या आवाक्याबाहेर असल्याचे बोलले जाते.






