अतिवृष्टीमुळे साठगाव ता.चिमूर येथे घरांची पडझड पती-पत्नी थोडक्यात बचावले डॉ.सतीश वारजूकर यांनी घेतली आपत्तीग्रस्त नागरिकांची भेट
चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
शंकरपूर, ( 13 ऑगस्ट ) : येथून जवळच असलेल्या साठगाव येथे काल (12 ऑगस्ट ) झालेल्या अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड झाली असून झोपेतच पती-पत्नीच्या अंगावर घर पडल्याने ते जखमी झाले आहेत. थोडक्यात त्यांचा जीव बचावला.
साठगाव येथील गजानन महादेव पांगुळ, शोभा अशोक पांगुळ, शामराव डोमाजी पांगुळ, रामचंद्र पांगुळ, गेदपुरी वैकुंठी यांचे काल झालेल्या रात्रीच्या अतिवृष्टीमुळे घराच्या भिंती पडलेल्या आहेत ; तर गजानन महादेव पांगुळ यांच्या घराच्या भिंती सोबतच घराचा आडा पडला. ते पती – पत्नी जिथे झोपलेले होते त्याच ठिकाणी आडा पडला. ते थोडक्यात बचावले असून त्यांना किरकोळ मार आहे. याबाबतची माहिती महसूल विभागाला दिल्यानंतर तलाठी आमटे यांनी पंचनामा केला.यासोबतच शंकरपूर येथील चेतन वांढरे, रामदास वाढरे यांचे राहते घर पडले असून या घरांचा पंचनामा तलाठी आत्राम यांनी केलेला आहे. वरील सर्व व्यक्तीचे राहते घर पडल्याने आता राहायचे कुठे? हा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे. शासनाने या सर्व व्यक्तींना तात्काळ घरकुल मंजूर करून द्यावे, अशी मागणी होत आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सतीश वारजूकर यांनी साठगाव येथे भेट दिली व अतिवृष्टीमुळे पडलेल्या घरांची पाहणी केली. सर्व सर्व आपत्तीग्रस्त कुटुंबाला तात्काळ घरकुल मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य रोशन ढोक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदू गावंडे, उपसरपंच पुराम व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.






