दलितांवरील अत्याचाराची चौकशी होवून दोषींवर कठोर कारवाई व्हावी
भिम आर्मीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
फहिम शेख
नंदुरबार-लॉकडाऊनच्या आडून दलित, आदिवासी, बौद्धांवर होत असलेल्या अत्याचार, हत्याकांडाची चौकशी होवून दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भिम आर्मीतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री यांना जिल्हाधिकार्यांमार्फत भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजुभाऊ रगडे यांनी दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच्या आडून काही गावगुंड दलित-बौद्ध-आदिवासींवर अत्याचार करत आहेत. त्यांचे हत्याकांड घडवत आहेत. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघात नरखेड तालुक्यातील (नागपूर जिल्हा) मेंढला पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर या राजकीय गावगुंडाने त्याच्या साथीदारांसोबत उच्चशिक्षित बौद्ध तरुणांचा विष देऊन दिवसा ढवळ्या हत्या करण्यात आली आहे. त्यात पोलिसांनी आत्महत्येचा (३०६,३४ अन्वे) गुन्हा नोंद करण्यात आला असुन ते चुकीचं आहे. त्या आरोपीवर ३०२ व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच शिर्डी येथील सागर शेजवळ या बौद्ध तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्यातील मारेकर्यांना राज्य सरकारने पॅरोल मंजूर केलाच कसा? त्यांचा पॅरोल तात्काळ रद्द करण्यात यावा.
बीड जिल्ह्यातील मांगवडगांव येथे तीन पारधी-आदिवासी मजुरांचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी. नरखेड (जिल्हा नागपूर) तालुक्यातील उच्चशिक्षित बौद्ध तरुणाची हत्या करणार्या मिथिलेश उमरकर वर ३०२ व अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व गुंह्याचा तपास एसआयटीमार्फत करण्यात यावा. शिर्डी येथील सागर शेजवळच्या मारेकर्यांना कोरोना महामारी च्या आडून राज्य सरकारने त्यांना जो पॅरोल मंजूर केला आहे तो तात्काळ रद्द करावा. बीड जिल्ह्यातील मांगवडगांव येथील पारधी-आदिवासींची निघृण हत्या करण्यात आली असून ती केस जलदगती न्यायालयात चालवण्यात यावी, अशी मागणी भिम आर्मीतर्फे करण्यात आली आहे. मागण्या मान्य पूर्ण न केल्यास भीम आर्मी भारत एकता मिशन राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजुभाऊ रगडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुजम्मील हुसैन यांच्या स्वाक्षर्या आहेत.






