गोळी लागून जखमी झालेले भारतीय जवान शहीद
धुळे : कर्तव्यावर असतांना मणिपूर सिमेलगत गोळी लागल्याने जखमी झालेले भारतीय जवान निलेश अशोक महाजन यांना विरमरण आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दि.६ नोव्हेंबर रोजी भारतीय जवान निलेश अशोक महाजन हे मणिपूर सिमेलगत कर्तव्यावर असतांना गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गुवहाटी येथील आर्मी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या सहा महिन्यांपासून उपचार सुरु असतांना काल रात्री जवान निलेश महाजन यांना विरमरण आल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील सोनगिर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
शहीद जवान निलेश महाजन यांच्या लहानपणी आई आणि वडीलांने छत्र हरपले होते.ते शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे मामांकडे राहत होते. चार वर्षांपूर्वी ते भारतीय सैन्यात भरती झाले होते. शहीद जवान निलेश महाजन यांचे वडीलांनी देखील भारतीय सैनिक म्हणून देशसेवा केली आहे. तर काका बि.एस.एफ मध्ये कर्तव्यावर असतांना २१ व्यावर्षी शहीद झाले होते. शहीद जवान निलेश महाजन यांच्यावर धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असून प्रशासनाकडून अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येत आहे.






