Pune

? धक्कादायक..पुण्यात बनावट इलेक्ट्रॉनिक व्यवसाय तेजीत, दुकानदाराचे परराज्यात धागेदोरे

? धक्कादायक..पुण्यात बनावट इलेक्ट्रॉनिक व्यवसाय तेजीत, दुकानदाराचे परराज्यात धागेदोरे

पुणे : नागरिकांनो सावधान तुम्ही जर पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणांहून इलेक्ट्रॉनिक साहित्याची खरेदी करत असल्यास काळजी घ्या. अन्यथा काही दुकानदारांकडून बनावट इलेक्ट्रॉनिक कंपनीचे साहित्य विक्री करून तुमची फसवणूक केली जाऊ शकते. संबंधित 15 ते 20 दुकानदारांविरूद्ध पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. जादा नफा कमविण्याच्या हेतूने संबंधित दुकानदारांकडून पररराज्यातील निकृष्ट इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करून शहरात विकले जात असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने नुकतेच इलेक्ट्रॉनिक बाजारात बनावट वायरिंग विक्रीचा धंदा उघडकीस आणला आहे.
इलेक्ट्रिक साहित्य विक्री दुकानदारांकडून बनावट साहित्याची विक्री करून सर्वसामान्यांचा जीव धोक्यात घातला जात असल्याचे उघडकीस आले आहे.
संबंधित बनावट निकृष्ठ दर्जाच्या कंपन्या वायर नामांकित कंपनीचे असल्याचे भासवून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे अनेकवेळा शॉर्टसर्किट होवून इमारतींना आग लागणे, जिवीत आणि मालमत्तेचे नुकसान होत असल्याच्या घटना शहरामध्ये घडल्या आहेत. त्यापाश्र्वभूमीवर बनावट व निकृष्ठ दर्जाच्या वायर वापरल्याने होणारे गंभीर अपघातांना आळा बसविण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.
बनावट वायर विक्री करणाऱ्या इलेक्ट्रिक व्यावसायिकांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने नुकतेच बनावट वायरिंगचे रॅकेट उध्वस्त केले आहे. पॉलीकॅब नामांकित कंपनीच्या नावाने बनावट वायर विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बुधवार पेठेतील पवन इलेक्ट्रिकल दुकानाचे मालक दिनेशसिंग राजपुरोहित यांच्याविरूद्ध कारवाई केली आहे. तर दुसरा आरोपी रमेशकुमार सुथार यांना अटक करण्यात आली आहे. संबंधितांच्या दुकानातील तब्बल 2 कोटींचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
व्यावसायिकांकडून अशी केली जातेय फसवणूक
शहरातील काही इलेक्ट्रॉनिक व्यवसायिकांकडून बनावट वायर आणि पॅकींगसाठी लागणारे साहित्य परराज्यातील इलेक्ट्रिक मार्केट मधून खरेदी केले जाते. त्यानंतर त्यांच्या मालकीच्या इलेक्ट्रिक शॉपच्या माध्यमातून बांधकाम व्यावसाईकांना साहित्याची विक्री केली जात आहे. शहरातील इतर 15 ते 20 इलेक्ट्रिक दुकानदार बनावट व निकृष्ठ दर्जाच्या वायर विक्री करीत असल्याचे पुणे पोलिसांच्या लक्षात आले आहे.
अनेक धनाढ्य व्यवसायिकांचा समावेश
इलेक्ट्रॉनिक व्यवसायात शहरातील अनेक धनाढ्यांचा समावेश आहे. कमी गुंतवणूकीत जादा नफा मिळत असल्यामुळे बनावट वायर व्यवसायाचे जाळे दूरवर पसरले आहे. त्याचे धागेदोरे परराज्यात असून बनावट व निकृष्ठ दर्जाच्या वायर उत्पादन व विक्री करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यासाठी देशातील विविध राज्यामध्ये गुन्हे शाखेच्या टिम रवाना केल्या जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button