कोकणातील काजूप्रश्नावर बडबड करणारे बोलबच्चन नेतृत्व ठरले कुचकामी!
जिल्हा बँक संचालक श्री अतुल काळसेकर यांचा सतीश सावंत यांना पुन्हा एकदा टोला
कोल्हापूरःआनिल पाटील
तोंडाने फक्त कोकणच्या शेतकऱ्यांसाठी बाता मारायच्या, यांच्या हाताने काही होत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील दुध-उत्पादक शेतकरी लॉबी सांभाळण्याकरता सरकार मंत्रीमंडळ बैठक घेऊन सानुग्रह अनुदान देऊ शकते, पण कोकणच्या काजू शेतकऱ्याला या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. शिवसेनेत गेलेले शेतकऱ्यांचे पुत्र नि मित्र तिथे मूग गिळून गप्प बसताहेत आणि इथे येऊन शेतकऱ्यांच्या हिताच्या थापा मारताहेत. सरकारमध्ये कोकणला कोणी वाली राहिला नाही. फुकाची बोलबच्चनगिरी करणाऱ्यांना आता कोकणच्या शेतकऱ्यांनी काजूची पाकिटे निरोपाची शेवटची भेट म्हणून देत घरी बसवायची वेळ आली आहे, अशी खरमरीत टीका जिल्हा बँक संचालक तथा भाजपा सिंधुदुर्गचे माजी जिल्हाध्यक्ष श्री अतुल काळसेकर यांनी सतीश सावंत यांच्यावर केली आहे.
मंत्रीमंडळाच्या खास बैठकीत चार कोटी लिटर दुधाचे रूपांतर भुकटीत करून दूध उत्पादकांना दिलासा देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. कोरोना मुळे बाजारात पिशवीबंद दुधाच्या मागणीत घट झाली असून दुधाची विक्री १७ लाख लिटरने कमी झाली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट मिठाई भांडार मोठ्या प्रमाणावर बंद आहेत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन महिन्याकरिता चार कोटी लीटर दुधाचे रूपांतर दूध भुकटीत करण्यास मान्यता देण्यात आली. ही योजना राबविण्यासाठी १२७ कोटी रुपये इतका निधी आकस्मिकता निधी खर्च करण्यात येईल. अतिरिक्त दूध भुकटी व लोणी एनसीडीएफआय – ई पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यास आणि त्यासाठी सेवा सुरु करण्यासाठी व त्यासाठीच्या सेवा शुल्कासाठी ०.३% खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे. शासन व सहकारी संस्था यांच्याकडून दूध संकलित केले जाईल. अतिरिक्त दुधाचे रूपांतर करण्यासाठी दूध भुकटी प्रकल्पांना पॅकिंग व जीएसटी सह २५ रुपये प्रतिकिलो लोण्याच्या पॅकिंगसाठी पंधरा रुपये असा दर देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे.
या शेतकऱ्यांना फायदा मिळतो म्हणून तक्रार नाही, पण कोकणच्या शेतकऱ्यांबद्दल शासनाच्या मनात आकस आणि दुजाभाव का? आकस्मिकता निधीसाठी कोकण हकदार का ठरू शकत नाही? जी परिस्थिती दुधाची आहे तीच काजूची पण आहे. पश्चिम महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था जशी दुधावर निर्भर आहे, तशीच कोकणची काजूवर आहे. काजूसाठी यापूर्वीच्या अर्थसंकल्पात भाजपा सरकारने १०० कोटी रुपयांची तरतूद केलेली असतानादेखील आघाडी सरकार सूडबुद्धीने कोकणी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. त्यानिमित्ताने बोलबच्चन शिवसेना नेत्यांचे सरकारमधले वजन तरी जनतेला कळून चुकले, आता उगाच पोकळ पत्रकार परिषदा घेऊन गल्लीत गोंधळ घालत बसू नका, असा सल्ला अतुल काळसेकर यांनी दिला आहे.






