आणूर येथे महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणीचा दिमाखदार प्रारंभ
150 मल्लांचा सहभाग
कोल्हापूर-सुभाष भोसले
परिवर्तन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कोल्हापूर राष्ट्रीय तालीम संघाच्या मार्गदर्शनाखाली आणूर (ता.कागल) येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी व राज्य अजिंक्यपद चाचणी कुस्ती स्पर्धेला दिमाखात प्रारंभ झाला. या स्पर्धेत 10 वजनी गटांमध्ये एकूण 150 मल्लानी आपला सहभाग नोंदवला आहे.
येथील महात्मा फुले विद्यालयाच्या पटांगणावर परिवर्तनचे मुख्य प्रवर्तक हभप सचिन पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर कोल्हापूर राष्ट्रीय तालीम संघाचे कार्याध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संभाजीराव वरूटे, संघाच्या तांत्रिक कमिटीचे चेअरमन बाबा शिरगांवकर, सचिव राजाराम चौगुले व प्रकाश खोत तसेच वस्ताद शिवाजीराव जमनीक यांच्या हस्ते वजन काटा पूजन व दीपप्रज्व्लन झाले. 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व 86 ते 125 या एकूण दहा वजन गटासाठी मॅट व माती या प्रकारात एकूण 150 मल्लांनी सहभाग नोंदवला आहे. प्रत्येक गटातून दोन याप्रमाणे चार व यातही ग्रामीण मधून दोन व शहर मधून दोन असे एकूण 40 मल्ल राज्य स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत.राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवरती चमकलेल्या जिल्ह्यातील अनेक पैलवानानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
यावेळी बोलताना सचिन पवार म्हणाले पालक व मुले यांच्यात प्रेरणा पेरण्यासाठी परिवर्तनने या स्पर्धेचे आयोजन अगदी ग्रामीण भागात केले आहे. भक्ती व शक्ती हेच महाराष्ट्राचे वैभव आहे.यावेळी निष्णात पंच बटू जाधव यांचेही मार्गदर्शन झाले.
तालीम संघांचे सेक्रेटरी संभाजीराव पाटील तसेच सर्व पंच, मुख्याध्यापिका राजश्री चौगुले, आनंदराव तोडकर, काकासाहेब सावडकर, उपसरपंच भारत बेनाडे यांच्यासह परिवर्तन चे सर्व स्वयंसेवक, कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
स्वागत बाळासाहेब मेटकर तर प्रास्ताविक मधुकर भोसले यांनी केले. आभार बाबासाहेब कोईंगडे यांनी मानले. सूत्रसंचालन के.बी.चौगुले यांनी केले
यांनी केले.






