अमळनेरच्या जिल्हा बँक शाखेमध्ये भोंगळ कारभार
सामजिक कार्यकर्ते गौतम बिऱ्हाडे यांचा आरोप
जेडीसीसी शेतकरी हिताची की हिनवणारी!
रजनीकांत पाटील
अमळनेर : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक ही आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक. शेतकरी हित जोपासणे हे बँकेचे ब्रीद असले तरी शेतकर्यांना हिनवणारी असाच आजपर्यंतचा तिचा प्रत्यय आणि अनुभूती. अमळनेर तालुक्यातून विद्यमान आमदार अनिल पाटील आणि तिलोत्तमा पाटील या दोघांना या बँकेवर नेतृत्त्वाची संधी सदस्यांनी दिलेली आहे. अनेकदा सत्ता खांदेपालट झालेले असतानाही या बँकेने अद्यापही आधुनकीतेची कास धरलेली नाही. काही शाखांचे व्यवहार आजही जुनाट पद्धतीनेच सुरू आहेत. अनेक गावांच्या शाखा कधीच वेळेवर उघडत नाहीत. कर्मचारींची ग्राहकांसोबतची उद्धट वागणूक बदललेली नाही. उपकार केल्यागत त्यांचे कामकाज असते. अशिक्षित, अज्ञानी ग्राहकांची नेहमीच हेळसांड या ठिकाणांवर होत असते. या शाखांमध्ये कोणत्याही सुविधा ग्राहकांसाठी नाहीत. चेक बुक, एटीएम जाऊच द्या पण पासबुक सुद्धा चार आठ महिने मिळत नाहीत एवढी दलिंदरी. विशेष बाब म्हणजे विद्यमान संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या शिरूड या मूळगावी या बँक शाखेची अतिशय विदारक अवस्था आहे. या शाखेत कर्मचारी उद्धटपणे तर वागतातच पण गेल्या अनेक महिन्यांपासून या शाखेने ग्राहकांना पासबुकही दिलेले नाही. सहकारातून स्वाहाकार झाला शेतकरी आणि सर्वसामान्यांचा उद्धार मात्र झालेला नाही. तालुक्यातून बँकेचे नेतृत्व करीत असलेल्या दोघाही संचालकांनी किमान आपल्या तालुक्यातील शाखांची ही अवस्था सुधारण्याकामी जाणीवपूर्वक लक्ष घालणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी ग्राहकांचा रोष उफाळून आल्यास बरगत होणार नाही, हेच खरे






