Pune

उजनी कालव्याद्वारे रब्बीचे आवर्तन लांबणीवर

उजनी कालव्याद्वारे रब्बीचे आवर्तन लांबणीवर

प्रतिनिधी दत्ता पारेकर
: उजनी धरणाच्या कालव्याद्वारे 15 जानेवारीला रब्बीसाठीचे पहिले आवर्तन सोडण्यात येणार होते. मात्र, शेतकर्यांामधून मागणी नसल्यामुळे नियोजित आवर्तन आता 15 ऐवजी 20 जानेवारीला सोडणार असल्याची माहिती उजनी अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

पुणे येथे 30 डिसेंबर रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत 15 जानेवारीला पाणी सोडण्याबाबत निर्णय झाला होता.

पाणी सोडल्यानंतर उजनी कालव्याद्वारे 30 ते 45 दिवस आवर्तन चालू राहणार आहे. कालव्यातून प्रारंभी 500 क्युसेक्सनंतर प्रत्येक सहा तासांनंतर पाणी वाढवून ते 3 हजार ते 3 हजार 200 क्युसेक्सपर्यंत मुख्य कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. मुख्य कालवा 20 कि.मी. असून, शेवरे गावच्या हद्दीतून उजव्या कालव्यात 119 कि.मी., तर डाव्या कालव्यात 126 कि.मी.पर्यंत जाणार आहे. डाव्या कालव्याद्वारे माढा, पंढरपूर (उत्तर भाग) मोहोळ, उ. सोलापूर, अक्कलकोटपर्यंतचे क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तर उजव्या कालव्याद्वारे माळशिरस (पूर्व भाग) पंढरपूर (दक्षिण-पश्चिम) भाग सांगोला व मंगळवेढ्यापर्यंत पाणी मिळणार आहे. या दोन्ही कालव्यांद्वारे 3 लाख 50 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. कालव्याद्वारे 5 ते 6 टीएमसी पाणी वापरले जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वीच उजनी धरणातून भीमा- सीना जोड कालव्याद्वारे (बोगदा) सीना नदीत पाणी सोडण्यात आले आहे. माढा तालुक्यातील 38 गावांना पाणी पुरवणार्यार सीना-माढा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू झालेले आहे.

माढा तालुक्यातील 38 गावांसाठी वरदान ठरलेल्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या 9 पैकी 6 मोटार सुरू करण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक मोटार 1100 अश्वशक्तीची आहे. या उपसा सिंचन योजनेद्वारे 40 हजार एकर क्षेत्रापैकी 25 ते 30 हजार एकर क्षेत्राला रब्बी हंगामातील पहिल्या आवर्तनाच्या पाण्याच्या लाभ मिळत असून काही ठिकाणचे तलाव भरून घेण्यात येत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button