Amalner

अमळनेर येथे “साहित्यिक गप्पा “कार्यक्रम संपन्न

अमळनेर येथे “साहित्यिक गप्पा “कार्यक्रम संपन्न

अमळनेर ‘लेखकाचे स्वातंत्र्य समाजाला प्रगतीच्या व प्रगल्भतेच्या दिशेने नेते म्हणून मित्रांमध्ये बोलतांना जे स्वातंत्र आपण घेतो तसे अभिव्यक्ती चे स्वातंत्र समाजाने लेखकाला व त्याच्या साहित्यकृती ला दिले पाहिजे!’ असे प्रतिपादन लेखक डॉ. प्रशांत बागड यांनी पूज्य साने गुरुजी ग्रंथालय, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अमळनेर व शिव बहुद्देशीय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “साहित्यिक गप्पा “या कार्यक्रमात केले.
‘साहित्यिक गप्पा’ च्या मंचावर अध्यक्ष म्हणून पुज्य साने गुरुजी ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, जेष्ठ मार्गदर्शक प्रा. प्रकाश धर्माधिकारी व शिव बहुद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित शिंदे उपस्थित होते. याप्रसंगी बोलतांना डॉ.बागड यांनी सांगितले की, ‘लेखकांबरोबरच वाचकही समर्थ झाला तर साहित्य अधिकाधिक समृद्ध होत जाते! लेखन करणे त्यासाठी भाषा वापरणे ही एक बहुआयामी प्रक्रिया असून आपल्या सभोवतालचे अनुभव मांडताना लेखक भाषा देखील घडवत असतो. या आदानप्रदानातूनच वाचक समृद्ध होत जातो यामुळे वाचकाने खुल्या मनाने वाचन करणे व लेखकाने मुक्त होऊन लिहीत जाणे आवश्यक असल्याचे” मतहि प्रशांत बागड यांनी मांडले.
यानंतर वाचकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी दिलखुलास उत्तरे देत साहित्य,तत्वज्ञान,भाषा,सामाजिक संदर्भात त्यांनी आपली भूमिका विषद केली. या प्रसंगी शब्द पब्लिकेशन तर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या “नवल” या कादंबरीतील उताऱ्याचे वाचन त्यांनी सादर केले.
दिलीप सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात साहित्तिक गप्पांच्या माध्यमातून साहित्याच्या चळवळी समृद्ध होतात असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. नितीन पाटील यांनी डॉ. बागड हे आपल्या साहित्यकृतीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात मराठी साहित्य विश्वाला एक नवीन वळण देणारी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रा. लिलाधर पाटील यांनी प्रशांत बागड यांचा परिचय करून दिला. आय आय टी कानपुर येथे तत्वज्ञान विषयाचे प्राध्यापक असलेले बागड अमळनेरशी निगडित असणे ही अभिमानाची बाब असल्याचे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन रणजित शिंदे यांनी केले. यावेळी रंगलेल्या चर्चेत कस्तुरी प्रकाशन चे गोकुळ बागुल, ग्रंथालयाच्या उपाध्यक्षा माधुरी भांडारकर,साहित्यिक भाऊसाहेब देशमुख, प्रा. दिनानाथ पाटील, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, नितीन संदानशिव, स्वप्नील चव्हाण, नयन पाटील, योगेश संदनशिव, प्रा. कृष्णा संदनशिव, भोजराज पाटील,प्रा.प्रमोद चौधरी आदिंनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button