‘थ्रीडी इमेज’ने अध्यापन प्रभावी व रंजक होते ही बाब विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात ठरले आकर्षण
अमळनेर – स्मार्ट फोनमुळे विद्यार्थी हे ज्ञान मिळविण्याच्या बाबतीत शिक्षकांपेक्षा अधिक गतिशील झाले आहेत. अशा वेळी शिक्षकांना काळाबरोबरव विकसीत होणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर मोबाईलचा सकारात्मक उपयोग करून ‘थ्रीडी इमेज’ने अध्यापन प्रभावी व रंजक होते ही बाब विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे शिक्षक उमेश प्रतापराव काटे यांनी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडली. या प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक होत असून यामुळे शिकणे अधिक रंजक होत असल्याची प्रतिक्रिया शिक्षक व मान्यवरांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पास माध्यमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
अनेक शिक्षक सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर करतात. मात्र,अध्यापनात पाहिजे तसा उपयोग करीत नाहीत. बऱ्याच वेळा अध्यापनाच्या वेळी अनेक शिक्षक मोबाईलवर बोलण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. ग्रामीण भागातील बऱ्याच जिल्हा परिषद शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे बरेच प्राथमिक शिक्षक तंत्रस्नेही झाले असून, अध्यापनात मोबाईलचा वापर करतात. मात्र,त्या तुलनेने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक कमी वापर करतात ही शोकांतिका आहे. या गोष्टींना तिलांजली देण्यासाठी शिक्षकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच अध्यापन कौशल्य विकसीत व्हावे या उद्देशाने उमेश काटे यांनी विज्ञान प्रदर्शनात शैक्षणिक साहित्याची मांडणी केली होती. या प्रदर्शनाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांमध्ये याचा प्रचार, प्रसार झाला आहे.अध्यापनाच्या वेळी शिक्षकांनी ‘थ्रीडी इमेज’च्या साह्याने शिक्षण देतांना सुरूवातीला संबंधित ‘इमेज प्ले स्टोअर’वर डाऊनलोड करावी. या ‘इमेजला स्कॅन’ केल्यास मोबाईलवर विद्यार्थ्यांसमोर ‘थ्रीडी इमेज’ दिसून येते.






