Kolhapur

जबाबदारीचे भान असलेले संघटन..-मंगेश धनवडे

जबाबदारीचे भान असलेले संघटन..-मंगेश धनवडे

सुभाष भोसले -कोल्हापूर
7 एप्रिल 2019 चा तो काळा दिवस. शिरोळ तालुक्यात कार्यरत असणारे कार्यतत्पर शिक्षक हरी गायकवाड मृत्यूदिन…. संघटन स्थापनेनंतरची ही जिल्ह्यातील तिसरी घटना. ज्यांना लहानपणापासूनच शारीरिक व्याधीने दोन्ही पायांवर कधीच उभा राहता आले नाही…. पण त्यांनी मात्र शाहूवाडीतील डोंगर भागात अत्यंत कौतुकास्पद सेवा बजावत अनेक मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले. आपली दहा वर्षांची सेवा बजावून आपल्या स्वगृही शिरोळ तालुक्यात बदलीने हजर झाले होते. आई-वडिलांनाही त्याचा आनंद झाला होता. पण नीयतीच्या मनात काही वेगळंच होतं. 7 एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. एका क्षणात त्यांची मुलं अनाथ झाली, वृद्ध माता-पिता आधारहीन झाले आणि अभागी पत्नी वर दुःखाचा डोंगर कोसळला. संपूर्ण गायकवाड कुटुंबावर शोककळा पसरली.
या अगोदर जिल्ह्यात झालेल्या दोन घटना हरी डोंगरे आणि राहुल शेजोळे. या बांधवांच्या कुटुंबीयांची जी अवस्था झाली होती तीच अवस्था गायकवाड कुटुंबीयांची झाली होती. कारण हे शिक्षक बांधव 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेले असल्याने फॅमिली पेन्शन आणि ग्रॅच्युईटी चा लाभ मिळणार नव्हता. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन या आपल्या हक्काच्या व्यासपीठाने जबाबदारीचे भान राखत युवा मनगटाच्या जोरावर माणुसकीचा पुल सांधत गायकवाड कुटुंबीयांना 60 हजार रुपयांचा मयत निधी देऊन आधार देण्याचा प्रयत्न केला. आणि माणुसकीची वीण घट्ट करत अशा प्रसंगात संघटन सदैव या कुटुंबियांच्या सोबत राहील, हा विश्वास निर्माण केला.
केवळ भावपूर्ण श्रद्धांजली चे मेसेज व्हाट्सअप व सोशल मीडियावर न टाकता अवघ्या चार वर्षात तयार झालेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या सर्व युवा शिलेदारांनी आपल्या एकजुटीने मयत झालेल्या बांधवांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा जणू चंग च बांधला आहे. आज सर्वच पेन्शन शिलेदारांनी आणि मदत करणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांनी माणुसकीचे दर्शन घडवत गायकवाड कुटुंबीयांना आधार तर दिलाच पण प्रशासन व्यवस्थेचा डोळ्यात झणझणीत अंजनही घालण्याचे काम केले. जिल्ह्यात आजपर्यंत अशा पाच घटना घडल्या आहेत. राज्यात आणि देशात अशी कित्येक कुटुंबीय यांच्यावर अशी वेळ आली. पण प्रत्येक वेळी पेन्शन हक्क संघटनच पुढे येऊन आपली नैतिक जबाबदारी पार पाडत आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर कोसळणाऱ्या या संकटाकडे पाहता आज गरज आहे ती खऱ्या अर्थाने जुनी पेन्शन योजना लागू होण्याची……
या निधी संकलनाच्या कामी मेहनत घेणाऱ्या चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा आणि अन्य तालुका टीमचे विशेष शिरोळ तालुक्यातही भरघोस निधी संकलन झाले आहे, पुढील आठवड्यात तो गायकवाड कुटुंबीय पर्यंत पोहोच होईल. शिरोळ तालुका टीमचे ही आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि संकलन निधीच्या कामाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि कौतुक अशी भावनिक प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button