31 ऑक्टोंबर 2005 कर्मचारी इतिहासातील काळा दिवस
-जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे
सुभाष भोसले-कोल्हापूर
1 ऑक्टोंबर 2005 हा कर्मचारी इतिहासातील काळा दिवस मानला जातो कारण कर्मचाऱ्यांच्या हक्काची जुनी पेन्शन योजना शासनाकडून बंद झाली. पेन्शन योजना बंद झाली, म्हणजे नेमकं काय झालं? हे समजण्या इतकं अभागी कर्मचाऱ्यांचं वयही नव्हतं आणि परिस्थितीही नव्हती. नोकरी मिळाल्याच्या आनंदात भविष्यात काय वाढून ठेवले याचा परिपक्व विचार त्या काळात झालाच नाही. खरं म्हणजे *निवृत्तीनंतरच्या जीवनातील सतत सुरू राहणारा झरा म्हणजे पेन्शन, निवृत्तीनंतरचे उत्पन्न म्हणजे पेन्शन, मृत्यूनंतर पत्नीची किंवा पतीची काळजी वाहणारी व्यवस्था म्हणजे पेन्शन, जीवनाची संध्याकाळ सोनेरी करणारी व्यवस्था म्हणजे पेन्शन, निवृत्तीनंतर रम्य प्रवासाची गॅरंटी म्हणजे पेन्शन, स्वाभिमानाचे जीवन जगण्यासाठी आवश्यक असते ती पेन्शन. आयुष्यातील इतकी महत्त्वाची गोष्ट आपल्यापासून हिरावून घेतली आहे, हे समजायला तब्बल दहा वर्षे लागलीत. शेकडो हजारो कर्मचारी मयत व्हावे लागले.
यातूनच न्याय हक्कासाठी सुरू झाला एक संघर्ष… अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा, प्रतिष्ठेचा, अन हक्काने हक्क मिळवण्याचा. आणि निर्माण झाले एक व्यासपीठ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन. हे ते एकमेव व्यासपीठ आहे ज्याने सर्वप्रथम 2005 नंतरच्या मयत कर्मचाऱ्यांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले. पेन्शन बंद झाल्याने काय नुकसान होत आहे, याला सर्वप्रथम वाचा फोडली. आज संघटन स्थापनेला चार वर्ष होत आहेत. गेल्या चार वर्षात तरुण मनांच्या बळकट मनगटावर पेन्शन चा विषय कोल्हापूर जिल्ह्याच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या तटा तटा पर्यंत पोहोचला. मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नवसंजीवनी देण्याचे काम संघटन कडून झालं. सद्यस्थितीत पेन्शनचे एकमेव लाभार्थी असलेले आमदार-खासदार यांच्या तोंडी कर्मचाऱ्यांनाही 1982 ची पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत, हे शब्द गळी उतरवायला संघटन यशस्वी झालं. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदपर्यंत कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली पाहिजेत, याचे ठराव बाहेर पडू लागले, नवीन चालू केलेल्या अत्यंत फसव्या आणि तकलादू योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशांचा हिशेब मागितला जाऊ लागला, मयत बांधवांच्या कुटुंबियांना ग्रॅच्युइटी मिळवून देण्यात अर्धे यश आले. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू होणार, हा विश्वास लाखो कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला.आज सुद्धा हजारो मयत बांधवांची कुटुंबे न्यायासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडे आस लावून बसली आहेत.
आज देशात आणि महाराष्ट्रात बदलत्या काळात हा लढा अधिकाधिक सक्षम होण्यासाठी कर्मचाऱ्यांची एकजूट अतिशय महत्त्वाची आहे. पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा ही परिस्थिती जोपर्यंत निर्माण होणार नाही आणि राजकीय व्यवस्थेला समजणार नाही तोपर्यंत लढावं लागेल. गेल्या चार वर्षात 31 ऑक्टोंबर हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येत आहे, त्यामागचा इतिहास जाणून सर्वांनी घ्यावा लागेल. आजच्या दिवसाच्या निमित्ताने या गोष्टी प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यानी स्मरणात ठेवाव्यात अशी भावनिक प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी व्यक्त केली.
न थकेंगे, न रुकेंगेजब तक है दम, लढते रहें






