आमदार निधीतून घाटी रुग्णालयास मिळाली २८ लाखांची वैद्यकीय यंत्रसामुग्री
गणेश ढेंबरे / औरंगाबाद
औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील ( घाटी रुग्णालयास ) कोविडग्रस्त रुग्णांकरिता वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आ. सतीश चव्हाण यांनी मे महिन्यात २८ लाखांचा आमदार निधी दिली होता. या आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेली यंत्रसामुग्री आ. सतीश चव्हाण यांच्या हस्ते अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कोवीड-१९ विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हास्तरावर परिणामकारक प्रतिबंधात्मक कार्यवाही होण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने १६ एप्रिल २०२१ रोजी वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १ कोटी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता.
आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोवीड-१९ च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी दिला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयास देण्यात आलेल्या २८ लाखांच्या निधीमधून ३० बायपॅप मशिन, १५० एनआयव्ही मास्क, १५० पेशंट सर्कीट आदी यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यात आली आहे.






