श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा लवकरच होणार कायापालट
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील अवघ्या मराठवाड्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज देवस्थान आणि परिसराचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान या देवस्थानाचा कायापालट व्हावा म्हणून महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार अनेक अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी देवस्थानाच्या विकासासाठी दोन कोटींच्या निधीला विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यमंत्री सत्तारांच्या प्रयत्नांना अखेर फळ मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मराठवाड्याचे श्रद्धास्थान असलेल्या सिल्लोड तालुक्यातील श्री सिद्धेश्वर महाराज देवस्थानाचा विकास करण्याचा शब्द राज्यमंत्री सत्तार यांनी दिला होता. त्याप्रमाणे गेल्या अधिवेशनात या देवस्थानाचा ‘ब’ वर्गाच्या तीर्थक्षेत्रात समावेश करून घेतला आहे. त्यानंतर या तीर्थक्षेत्राला क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी निधी मिळवण्यासाठी सातत्याने राज्यमंत्री सत्तार पाठपुरावा करीत होते. त्यामुळे त्यांनी जनतेला दिलेला शब्द पाळल्याच्या भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहेत.






