खासदारांच्या आवाहनानंतर काही तासात राहुलला मिळाली आर्थिक मदत
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : परभणी येथील डॉ.राहुल विश्वनाथ पवार या अत्यंत गरीब कुटुंबातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलाला 15 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यावर औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्या उपचारासाठी आईवडिलांकडे पैसेच राहिले नव्हते. ही बाब खासदार इम्तियाज जलील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ट्विट करून राहुलला मदत करण्याचे आवाहन केले होते.
खासदारांच्या आवाहनानंतर अवघ्या 18 तासात राहुलच्या उपचारासाठी दोन ते अडीच लाख रुपयांची मदत मिळाली. याबद्दल त्याच्या कुटीबीयांनी खासदार इम्तियाज जलील यांचे आभार मानले. दरम्यान, अद्याप राहुल पूर्णपणे बरा झाला नसून त्याला म्युकोरेमायसिस झाल्याचे त्याच्या मित्राने सांगितले आहे. सध्या त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला व्हेंटिलिटवर ठेवण्यात आले आहे.






