चिंताजनक! म्युकोरमायकोसिसने शहरात घेतला 16 जणांचा बळी
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता औरंगाबाद शहरावर म्युकरमायकॉसिस या आजाराची पकड घट्ट होत आहे. एक एप्रिलपासून 15 मे पर्यंत म्हणजे दीड महिन्याच्या काळात या आजाराचे 201 रुग्ण शहराच्या विविध रुग्णालयांत दाखल असून, त्यांच्या पैकी सोळा जणांचा मृत्यू झाला आहे.
‘म्युकरमायकॉसिस’च्या आजाराने करोनाइतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त चिंता निर्माण केली आहे. या आजाराचा उपचार खर्चिक असल्यामुळे व शासनाच्या माध्यमातून या आजारावरील उपचारासाठी अत्यल्प पॅकेज देण्यात आलेले असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समोर आजाराबरोबरच आर्थिक प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
हा आजार करोनाचा आजार होऊन गेलेल्यांना होत असल्यामुळे या आजाराबद्दलचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. शहरातील 6 रुग्णालयांनी या आजाराची माहिती मनपाला पाठविली आहे.
त्यानुसार, एमजीएम हॉस्पिटलमध्ये 76 , एशियन हॉस्पिटलमध्ये 24, कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये 5, धूत हॉस्पिटलमध्ये 3, अपेक्स हॉस्पिटलमध्ये 43 तर घाटी रुग्णालयात 50 रुग्ण दाखल झाले आहेत.
या पैकी मधुमेही रुग्णांची संख्या 76, ऑक्सिजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या 110, स्टेरॉइड लागणाऱ्यांची संख्या 148 होती. 201 रुग्णांपैकी 16 जण आतापर्यंत दगावले असून सध्या सात जणांवर उपचार केले जात आहेत.






