त्या 5 नराधमांना फाशी द्या:बिरसा क्रांती दलाची मागणी
रत्नागिरी : नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात दुधाळा गावात अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करणार्या पाच नराधामांना फाशी द्यावी,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री. उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कडे दिनांक 05/01/2021 रोजीच्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, देशात ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ ‘अभियान सुरु असतांना दुसरीकडे मात्र राज्यात नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात असलेल्या दुधाळा गावात १४ वर्षाच्या मुलींवर पाच जनांनी सामुहिक पाशवी अत्याचार केला. या घटनेचा बिरसा क्रांती दलाचे वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे.
पीडित मुलगी ही दुधाळा येथील रहिवासी असून गावातील आटाचक्कीवर दळण घेऊन गेली होती. आटाचक्कीवर गर्दी असल्याने ती परत घराकडे येत असतांना अतुल विश्वनाथ हटवार ( वय -२५ वर्षे ) याने तिला वाटेत अडविले आणि बळजबरीने मोटारसायकलवर बसवून खिंडसी परिसरात नेले.
त्यानंतर अतुलने तिथे धीरज जयराम मेहरकुळे (वय -३८ वर्षे ),सौरभ दिलीप मेहरकुळे ( वय -२३ वर्षे ), हर्षल राजू मेहरकुळे ( वय -२१ वर्षे ) व होमदास ताराचंद मेहरकुळे ( वय -४० वर्षे ) चौघेही रा.दुधाळा यांना बोलावले.आणि या पाचही जनांनी तिच्यावर आळीपाळीने पाशवी अत्याचार केला.ही घटना मंगळवार दि.२९ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पिडीत मुलीचे आईवडील त्यांच्या सराखा ( बोर्डा ,ता.रामटेक ) या मूळ गावी गेले होते. दरम्यान , आईवडील घरी परत आल्यानंतर त्यांना ती दिसली नाही. त्यामुळे आईने आटाचक्कीवर जाऊन चौकशी केली.त्यावेळी रडत रडत दुसऱ्याच्या मदतीने ती घराकडे जात होती. घरी पोहोचल्यावर तिने घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला.परंतू या नराधमांच्या प्रचंड दहशतीपोटी त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली नाही.
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या राज्यात चिमुकल्या, अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या दररोज घडत असलेल्या घटना अत्यंत दुर्दैवी असून राज्याला कलंकित करणा-या आहे.
या पीडित अल्पवयीन मुलीला जलदगतीने न्याय मिळावा म्हणून सदर प्रकरण फास्ट ट्रँक कोर्टात चालवून अत्याचार करणा-या या पाचही नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी.
यापूर्वी सुद्धा रायगड जिल्ह्यातील पेण मधील तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलींला घरातून उचलून नेऊन तिच्यावर पाशवी बलात्कार झाला. त्यानंतर तीचा खून करण्यात आला. या प्रकरणाची शाई वाळत नाही , तर ही लगेच दुसरी घटना.
देशात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कठोर केलेला असतांनाही दिवसेंदिवस अत्याचार वाढत असून आदिवासी सुरक्षित नसल्याचे या घटना साक्ष देतात. त्यामुळे अत्याचारा संदर्भातील सर्व खटले फास्ट ट्रक कोर्टात चालविण्यात यावे.व जलदगतीने न्याय देण्यात यावा,अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या कडे केली आहे.






