Amalner

स्वर्गवासी उदय वाघांच्या प्रथम स्मृतीदिनी जिल्हाभरात वाहिली जाणार आदरांजली अमळनेरात शनिवारी

स्वर्गवासी उदय वाघांच्या प्रथम स्मृतीदिनी जिल्हाभरात वाहिली जाणार आदरांजली अमळनेरात शनिवारी सर्वपक्षीय स्मृती सभा..

रजनीकांत पाटील अमळनेर

Amalner : अमळनेर-जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वाघाप्रमाणेच आपले अस्तित्व निर्माण करणारे,तरुणांपासून जेष्ठांपर्यंत लोकप्रिय ठरलेले आणि राजकीय क्षेत्रात संघटन,विकास,वक्तृत्व आणि नेतृत्व हे गुण अवगत असणारे जिल्हा भाजपाचे नेते तथा माजी जिल्हाध्यक्ष स्वर्गीय उदय भिकनराव वाघ यांच्या शनिवार दि 28 नोव्हेंबर रोजी प्रथम स्मृती दिनी अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात प्रतिमपूजन होऊन त्यांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे.
या दिवशी अमळनेर येथे सायंकाळी 4 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील ट्रक टर्मिनस च्या भव्य प्रांगणात सर्वपक्षीय स्मृती सभा होणार असून याठिकाणी सर्वपक्षीय नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते एकत्रित येऊन उदय बापूंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.तर सकाळी जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांसह अमळनेर तालुक्यातील विविध गावात बापूंचे प्रतिमपूजन होऊन सामूहिक आदरांजली दिली जाणार आहे,अमळनेर शहरात देखील चौकाचौकात प्रतिमा पूजन होणार आहे.उदय बापूंच्या गावी डांगर बु येथे संपुर्ण गाव एकत्र येऊन आदरांजली दिली जाणार आहे.उदय बापू हे वाचन प्रेमी व वाचनाच्या चळवळीला चालना देणारे असल्याने त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून दोधवद येथे सार्वजनिक वाचनालयात अँड व्ही आर पाटील यांच्या संकल्पनेतून स्व उदय वाघ यांच्या प्रतिमेचे अनावरण होणार आहे,तर रडावन येथे सार्वजनिक व्यायाम शाळेस उदय वाघ यांचा नामकरण सोहळा होणार आहे,याशिवाय उद्यापर्यंत अजून काही सामाजिक उपक्रम राबविण्याचे नियोजन कार्यकर्ते करीत असून जिल्ह्यात प्रथमच राजकीय नेत्यास यापद्धतीने मोठ्या प्रमाणात आदरांजली चे कार्यक्रम होणार आहेत.
अमळनेर आणि स्व उदय बापू यांचं एक अतूट नातं होत,बालपण सोडलं तर ते आपले संपूर्ण आयुष्य अमळनेर तालुक्यातील जनतेसाठी त्यांनी बहाल केले.स्वकर्तुत्वाने तालुक्यात प्रचंड असा गोतावेळा त्यांनी निर्माण केला असताना आणि त्यांच्याकडून राजकीय व सामाजिक दृष्टीने प्रचंड अपेक्षा असताना गेल्या वर्षी दि 28 नोव्हेंबर रोजी अचानक त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने साऱ्यांनाच धक्काच बसला, माजी आ. श्रीमती स्मिताताई वाघ यांनी मोठ्या धक्क्यातून स्वतःला सावरत कार्यकर्त्यांना धीर देत आपला जनसेवेचा प्रवास सुरूच ठेवला असला तरी स्व उदय वाघांची कमी आज वर्ष लोटले तरी कायम भासत असून 28 नोव्हेंबर हा त्यांचा स्मृती दिन जवळ आल्याने त्यांच्या आठवणींचा स्रोत अधिकच वाढू लागला आहे,सोशल मीडियावर तर अधिकच कार्यकर्त्यांच्या भावना उमटू लागल्या आहेत.
दरम्यान डांगर बु सारख्या छोट्याश्या गावातून जन्मले असताना उदय वाघ यांनी आपल्या कौशल्याने संपुर्ण जळगाव जिल्ह्यांतच नव्हे तर धुळे,नंदुरबार व नाशिक जिल्ह्यापर्यंत राजकिय वर्तुळात नावलौकिक मिळविले अमळनेर शेतकी संघ संचालक, जळगाव जिल्हा बँक संचालक,जिल्हा दूध संघ संचालक, दोनदा जळगाव भाजपा जिल्हाध्यक्ष, आणि अमळनेर बाजार समिती सभापती अश्या पदांवर त्यांनी मजल मारली,त्यांना पत्नीच्या रूपाने स्मिताताई वाघ यांची खंबीर साथ असल्याने तीनदा जि प सदस्य,जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश चिटणीस आणि विधानपरिषद आमदार अशी अनेक मोठी पदे स्मिताताईच्या साथीने मिळाली,राजकारण करताना काही चांगलं झालं तर उडायच नाही आणि वाईट झालं तर खचायचे नाही हीच त्यांची खासियत होती,चळवळीतुन गेलेले कार्यकर्ते असल्यांने संघर्षाने कधीही त्यांचा पिच्छा सोडलाच नाही,अमळनेर तालुक्याच्या विकासासाठी त्यांची धरपड मोठी होती,बाजार समितीला नवे रूप देण्यात ते यशस्वी ठरले,पांझरे तुन चिखली व माळन नदीजोड प्रकल्प हे त्यांचे स्वप्न होते,तसेच जिल्ह्यात प्रथमच अमळनेर तालुक्यात तालुका दूध संघास मंजुरी त्यांनी मिळविली,अजूनही स्मिताताई हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत,अश्या महत्त्वाकांक्षी नेत्यास शनिवारी सामूहिक श्रद्धांजली साठी स्मृती सभेला उपस्थित राहावे असे आवाहन सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यानी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button