इंदापूर शहरातील पूर स्थितीची हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:पुणे जिल्हात बुधवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. अनेक भागात,शेती पिकाचे नुकसान झाले घरामध्ये, दुकानांमध्ये, पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज गुरुवारी (दि.15) या भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. शासनाने नुकसानीचे पंचनामे करीत बसण्यापेक्षा तात्काळ मदत करावी,अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले,’ काल दिवसभर व रात्री इंदापूर शहरात व तालुक्यांमध्ये आकडेवारीनुसार सुमारे १६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. इंदापूर तालुक्यात आज पर्यंत एवढा कधीही पाऊस झाला नव्हता. या मोठ्या पावसाने रस्ते वाहून गेले, अनेक घरात, दुकानात पाणी शिरले आहे. वीजपुरवठा खंडित झाला आहे. संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे. अजूनही पाणी येत आहे. तातडीची परिस्थिती निर्माण झाली आह. त्यामुळे आमची सरकारला आणि प्रशासनाला मागणी आहे की बाधित कुटुंबांना मदत दिली पाहिजे. वेळ न लावता ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. अनेकांना राहायला जागा नाही,अशी परिस्थिती आहे.
त्याचबरोबर शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेत जमीन वाहून गेली आहे. पिके वाहून गेली आहेत. बऱ्याच ठिकाणी काढलेले धान्य देखील खराब झाले आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात उभारलेले शेततळे वाहून गेली आहेत. पाझर तळे फुटले आहेत.अगोदरच शेतकरी हैराण झाला होता. त्यात या संकटामुळे त्याचे अजुन अधिक नुकसान झाले आहे. ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी म्हणून जाहीर केली जाते. आता त्यापेक्षा काल दुप्पट पाऊस झाल्याने प्रशासन, जिल्हाधिकारी, नगरपालिका या सर्वांनी या कामांमध्ये मदत केली पाहिजे.
हवामान खात्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सरकारने तातडीने मदत करण्याची आवश्यकता आहे. स्थलांतरित कुटुंबाची राहण्याची, निवाऱ्याची अन्नधान्याची व्यवस्था केली जाईल. शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.






