दगडी दरवाजाचा बुरुजाचा भाग क्षतीग्रस्त झाल्याने राज्यमार्ग 15 वरील अवजड वाहतूक इतरत्र वळवा
पालिका हद्दीत अवजड वाहतुकीमुळे नवीन रस्त्याची वाट लागत असल्याने नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर-शहरातील वेस (दगडी दरवाजा ) या राज्य संरक्षित स्मारकातील बुरुजाचा भाग क्षतीग्रस्त झाल्यामुळे राज्यमार्ग 15 वरील वाहतुक इतरत्र वळविण्याबत त्वरित निर्णय घ्या अशी मागणी अमळनेर च्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ पुष्पलता साहेबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अवजड वाहतुकीमुळे पालिका हद्दीतील नवीन रस्त्याची वाट लागत असल्यांने नगराध्यक्षानी हे निवेदन वजा पत्र दिले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की अमळनेर येथील (दगडी दरवाजा ) हे शासन निर्णय दिनांक 15 जानेवारी, 1970 रोजी राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यात आलेले आहे. अमळनेर शहरातील मध्यभागातून जाणारा मेहेरगांव धुळे – अमळनेर चोपडा खरगोन राज्य मार्ग 15 हा महाराष्ट्र मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मुख्य रस्तावरील रहदारीच्या भागात उपरोक्त वेस, (दगडी दरवाजा ) आहे. त्यामुळे नागरीक व वाहनधारक यांची मोठया
प्रमाणात वर्दळ असते – शिवाय रस्ता वाहतूकीच्या तुलनेने फारच अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कायम कोंडी होत असते. अमळनेर वेस, (दगडी दरवाजा ) बुरुजाचा भाग दिनांक 24 जुलै, 2019 पासून स्थिती धोकादायक असून कुठलीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सदर राज्यमार्ग 15 या मुख्यरस्त्यावरील 14 मीटर रुंदीचे कॉक्रीटीकरणाचे काम सुरु
असल्यामुळे या राज्यमार्गावरील पर्यायी वाहतूक व्यवस्था शहरातील रस्त्यावरुन केल्यामुळे सदर शहरातील रस्त्यांची वाहन क्षमता 6 ते 8 टनापर्यत असल्यामुळे सदर रस्त्यावरुन परिमाणापेक्षा जास्त परिणामाची वाहतूक होत असल्याने भारतीय रस्ते परिसर (आयसीआर) नुसार एक्सल लोड झाली असून पावसामुळे रस्ते दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहेत, यामुळे ही बाब नागरिकांच्या दृष्टीने निश्चितच योग्य नाही. यासाठी अमळनेर वेस, (दगडी दरवाजा ) या राज्य संरक्षित स्मारकाच्या बुरुजाचा भाग पावसामुळे क्षतीग्रस्त झाल्यामुळे राज्यमार्गावरील वाहतूक अमळनेर न प च्या कमी परिणामांच्या रस्त्यावरून जात परिणामाच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करुन रस्ता दुरुस्तीसाठी सा बा बांधकाम विभाग अमळनेर यांच्या मार्फत नवीन रस्ता करून मिळावा त्यानंतरच वाहतुकीचा निर्णय घ्यावा अन्यथा जड वाहतूक इतरत्र वळविण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांनी केली आहे.






