आदिवासी भागात १०८ ची रूग्णवाहीका उपलब्ध करून द्या – बिरसा क्रांती दलाची मागणी
प्रतिनीधी – दिलीप आंबवणे
प्राथमिक आरोग्य केंद्र तिरपाड, तळेघर, अडिवरे या तीन ठिकाणी 108 रुग्णवाहिका सेवा गेल्या अनेक दिवसापासून सुरू करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे भीमाशंकर व आहुपे परिसरातील ४३ गावे वाड्या वस्त्या येथील नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रावर तीन ठिकाणी १०८ रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव हे ७० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री कोणत्याही प्रकारच्या घटना घडल्यावर नागरिकांना दवाखान्यात जाण्यासाठी वाहन मिळत नाही. त्याचप्रमाणे डिलिव्हरी पेशंट, सर्पदंश पेशंट, सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा, पोट दुखणे, अंगावरून लकवा जाणे असे अनेक आजार आदिवासी भागात वाढत आहेत. वाहन उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढत आहे याला जबाबदार आरोग्य विभाग आहे .संबंधित 108 रुग्णवाहिका नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हे जाणून बुजून आदिवासी भागातील आरोग्य सेवेला अडथळा करत आहेत असे दिसत आहे त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई करून तात्काळ तीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात.
तसेच आदिवासी विकास विभागाकडून आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो तरी सुध्दा आदिवासी भागात गोळ्या औषधांचा तुटवडा दिसत आहे. तिरपाड येथे नर्स ही जागा रिक्त आहे. तसेच डाँक्टर हे २४ तास उपलब्ध नसतात.
या घटनेला जबाबदार असणारे अधिकारी व संबंधित एजन्सी यांच्यावर आदिवासी लोकांची फसवणूक करणे, आदिवासी लोकांचे मानसिक छळ करणे, आणि आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळणे, आदिवासी म्हणून त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे त्यांना आरोग्यसेवा न देणे. त्यामुळे त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ कलम ४ नुसार गुन्ह्यास पात्र आहे व भारतीय दंड संविधान १८६० राज्यघटनेतील अनुच्छेद नुसार कारवाई करण्यात यावी असे न झाल्यास प्रशासकीय अधिकारी निरपेक्षपणे काम करत नाही सदरची बाब घटनाबाह्य असून या संदर्भात आपल्याकडून तिरपाड,तळेघर ,अडिवरे या ३ ठिकाणी १०८ रूग्नवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी बिरसा क्रांती दलाचे राज्य सचिव डी बी घोडे, विजय आढारी, बाळकृष्ण मते, दिलीप आंबवणे यांनी केली आहे.






