लोणे येथील रोखला बालविवाह संरक्षण अधिकारी श्रीमती योगिता चौधरी यांनी केले समुपदेशन…
अमळनेर :-रजनीकांत पाटील
लोणे (भोणे) ता.अमळनेर येथील भिवदास सोनू अहिरे यांचा मुलगा समाधान वय १८ याचे लग्न निलचंद गायकवाड रा.चांदसर ता.धरणगाव यांची मुलगी ज्योती वय १७ हिच्याशी जमले होते. त्यानुसार दि. ११ रोजी सदर विवाह लोणे ता.अमळनेर येथे आयोजित करण्यात आला होता.
लोणे येथे बालविवाह होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षण अधिकारी योगिता चौधरी यांनी ग्रामसेवक नरेश सुर्यवंशी, पोलीस पाटील पुना पाटील, सरपंच कविता पाटील, पोलीस शिपाई गायकवाड यांच्या सहकार्याने विवाह बद्दल शहानिशा केली असता वरपित्याने वर वधू अल्पवयीन असल्याचे मान्य केले. त्यानुसार संरक्षण अधिकारी श्रीमती चौधरी यांनी बालविवाहाबाबत समुपदेशन करून बालविवाह प्रतिबंध कायद्याची उपस्थितांना माहिती दिली. परिणामी वर व वधू अल्पवयीन असल्याने बालविवाह थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. आपसात समेट झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.






