? अमळनेरकरांनो सावधान…कोरोना रुग्णांची वाढती संख्या..जबाबदार कोण सुस्त प्रशासन की मस्त जनता…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.ही चिंता जनक बाब आहे. दिवसेंदिवस अमळनेर तालुक्यातील परिस्थितीत आरोग्य दृष्टीने खराब होत आहे. आता पर्यंत अजिबात गांभीर्याने लक्ष न दिलेला कोरोना संसर्गाचा विषय गंभीर होत चालला आहे. यात चूक कोणाची ? सुस्त प्रशासनाची की मस्त जनतेची?
तस पाहिलं तर अमळनेर ला अनेक चांगल्या गोष्टींचा वारसा लाभला आहे. पण आता एका बेजबाबदारपणे वागण्याचा दंड आणि बदनामी चा इतिहास ही अमळनेर च्या इतिहासात नोंदविला जात आहे.
मुंगसे तालुका अमळनेर येथील कोरोना पॉझिटिव महिला रुग्ण सदर हॉस्पिटल मध्ये तपासणीसाठी गेली होती व त्या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने सदर हॉस्पिटल सील करण्यात आले होते. आणि त्या महिलेच्या संपर्कात जे जे संशयित होते त्या सर्वांना जळगाव येथे कोरोंटाईन करण्यात आलेले होते. त्यातच या हॉस्पिटलचे डॉक्टर आणि इतर संपर्कात आलेले असे एकूण सात जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने चोपडा शहर आणि तालुका कोरोना मुक्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणून चोपडा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.
अमळनेर पासून फक्त 34 की मी दूर असलेल्या चोपडा शहरात एकही कोरोना रुग्ण आढळुन येत नाही.तसे पाहिले तर नेहमी अमळनेर च्या तुलनेत चोपडा शहराला कमी लेखले जाते.दोन्ही तालुका पातळीवर कार्यरत शहरे आहेत.दोन्ही ठिकाणी प्रशासन कार्यरत आहे.नागरिक ही आहेत.विकासाच्या दृष्टीने चोपडा फारसं पुढे गेलेल नाही पण आज सर्वात मोठी लढाई चोपडा शहराने जिंकली आहे ती म्हणजे आयुष्याची लढाई..जगण्याची लढाई…तसं पाहिलं तर चोपडा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. या संपुर्ण तालुक्यात आदिवासी जमाती मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.आदिवासी जमाती अशिक्षित, मागासलेल्या समजणाऱ्या सुशिक्षित समाजाच्या कानात मारणारा हा क्षण आहे.जी गोष्ट सामान्य,गरीब,अशिक्षित आदिवासी समजू शकतो ती उच्च शिक्षित जनता समजू शकत नाही!
अमळनेर येथील सुस्त प्रशासन जे फक्त चार डोक्यांना घेऊन नियोजन अति आत्मविश्वासात करत आहे तेही स्वतः नियम न पाळता.. यात उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपरिषदेचे कर्मचारी इ चा समावेश आहे. समाजातील इतर घटक, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते इ ना विश्वासात घेऊन एक परफेक्ट नियोजन केले जाऊ शकते. चर्चा करून मार्ग तोही प्रभावी उपाय अंमलात आणला जाऊ शकतो. सामान्य लोक जे भाजी,किराणा ,इतर किरकोळ वस्तूं साठी गर्दी करतात त्याच योग्य नियोजन केल्यास ही गर्दी कमी होऊन कमी मनुष्यबळ उपयोगात आणून अधिक प्रभावी उपाय योजना राबविल्या जाऊ शकतात.परंतु अमळनेर तालुक्यातील सर्वत्र “मेरी मर्जी” प्रमाणे कारभार चालत आहे.आणि त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
अमळनेर चे अति उत्साही,अति आत्मविश्वास असलेले,अति सुशिक्षित नागरिक देखील याला तितक्याच प्रमाणात जबाबदार आहेत. जसे कधी खायला भेटणार नाही या आवेशात बाजारात गर्दी करतात,मास्क लावत नाही,सामाजिक,शारीरिक अंतर ठेवत नाही, सॅनिटाइझर चा उपयोग करत नाही, विनाकारण गावात फेर फटका मारायला त्यांना मजा वाटते,ठिक ठिकाणी ,चौका चौकात गर्दी करून उभे राहतात इ गोष्टींचा परिणाम त्यांच्या च आरोग्यावर होणार आहे याची फिकीर च नाही!
आता अमळनेरकरांची जबाबदारी वाढली आहे. शहरासह तालुक्यातील सर्वांनीच कोरोना मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. चला तर मग तुम्ही आपण सर्वजण आपले शहर आणि आपला तालुका आरोग्य दाई आणि कोरोना मुक्त करण्यासाठी लढू या.आपण आपलं कर्तव्य पार पाडू यात. त्यासाठी स्वतः आपण नियम पाळू, दुसऱ्यांना सांगू,विनंती करू, पुढाकार घेऊ.चला तर अमलनेरकरांनो एक योद्धा म्हणून ही लढाई जिंकू या….






