खासदार उन्मेष पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला आढावा
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाविषयी माहिती देऊन अमलबजावणीच्या दिल्या सूचना
अमळनेर प्रतिनिधी योगेश पवार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर आणि तालुक्यातील क्वारोनटाईन, परराज्यातुन आलेल्या मजुरांची व्यवस्था, उज्वला गॅस, लाभार्थ्यांना धन्य वितरण आदी विविध बाबींचा खासदार उन्मेष पाटील आणि आमदार स्मिताताई वाघ यांनी बुधवारी आढावा घेत प्रशासनाला केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाविषयी माहिती देऊन त्याची अमलबजावणीच्या सूचना दिल्या.
प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत खासदार उन्मेष पाटील आणि आमदार स्मिताताई वाघ यांनी कोरोना आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाविषयी प्रशासनाने केलेली तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, नगर परिषदेचे संजय चौधरी, डॉ. प्रकाश ताळे, बजार समिती सभापती प्रफुल पवार, भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष उन्मेष वाल्हे, राकेश पाटील, आदी उपस्थित होते.
यावेळी अमळनेर शहर आणि तालुक्यातील क्वारोनटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या, परराज्यातुन आलेल्या आणि चोपडा रस्त्यावर वसतिगृहमध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीं आणि त्यांच्या दोघे वेळ जेवणाची व्यवस्थेची चौकशी केली.
सी सी आय कापूस खरेदी केंद्राबाबत खासदार उन्मेष दादा पाटील आमदार स्मिताताई वाघ यांची पणन मंत्र्यांशी चर्चा
सी सी आय कापूस खरेदी केंद्राबाबत आमदार स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून सदर केंद्र सुरू करण्या बाबत विचारणा केली असता, जिल्हाधिकारी यांनी सदर केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. खासदार व आमदार यांनी याबाबत पणनमंत्री यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असून याबाबत मेल द्वारे पत्रव्यवहार केला आहे.
उज्वला गॅस, पंतप्रधान गरीब कल्याण योजनाच्या लाभार्थ्यांस पाच किलो धान्य वाटपाच्या सूचना
उज्वला गॅस, पंतप्रधान गरीब कल्याण योजना अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांस दिले जाणार पाच किलोग्राम धान्य वाटप संदर्भात सूचना केल्या. तसेच जनधन योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेले पाचशे रुपये लाभार्थ्यांना देण्याची बँकांनी केलेली व्यवस्था विषयी चौकशी केली. तर जनधन खाते पोस्ट विभागात देखील हस्तांतरित केली जाणार आहेत, याविषयी देखील माहिती जाणून घेतली. तर पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत दिले जाणारे २ हजार रुपये किती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमलेले आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा नाहीत, त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड अपडेट करण्याबाबत सूचना केल्या, तर संजय गांधी निराधार योजना बाबत देखील आढावा घेतला.
खासदार उन्मेष पाटील यांनी अमळनेर बाजार समितीला भेट देऊन केले कौतुक
खासदार उन्मेष पाटील यांनी आमदार स्मिता वाघ यांच्यासोबत बाजार समितीला भेट दिली. बाजार समिती मार्फत सुरू असलेल्या लिलाव प्रक्रिया आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व्यापारी घेत असलेली काळजी, बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी ठेवलेली व्यवस्था पाहून खासदार पाटील यांनी अमळनेर बाजार समितीचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी बाजार समिती सभापती प्रफुल पवार यांनी बाजार समिती सुरू करण्यासाठी आमदार स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेला पाठपुरावा विषयीची माहिती खासदारांना दिली. त्यामुळे जिल्ह्यात ज्या चार बाजार समिती आज सुरू आहेत त्याकेवळ आमदार वाघ यांच्यामुळेच. ऐन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती सुरू झाल्याने शेतकरी समाधानी असल्याचे दिसत असल्याची नमूद करत खासदार पाटील यांचे प्रफुल पवार यांचे आभार मानले.






