इंदापूरात जनता कर्फ्यूला उस्फूर्तपणे प्रतिसाद.शंभर टक्के बंद पाळत कोरोनाशी दोन हात…
टोल,बसस्थानकासह इंदापूरात सर्वत्र शुकशुकाट ! तात्काळ मदतीसाठी पोलिस यंत्रणा सज्ज.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत संपूर्ण भारतभर जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इंदापूर करांनी ही शंभर टक्के जनता कर्फ्यू ला आपला प्रतिसाद दिलाय.
एरवी गजबजलेल्या इंदापूरात आज नजर जाईल तिकडे शुकशुकाट पहायला मिळतोय. तर सरडेवाडी टोल,इंदापूर बसस्थानक व शहरातील मुख्य बाजारपेठा ही ओस पडल्याचे दिसून येेेतेय.शहरातील सर्व बाजारपेठ ठप्प असून नागरिकांच्या सेवेसाठी केवळ अत्यावश्यक सेवा चालू आहेत. तर इंदापूर तालुक्याच्या ठिकाणचा आज आठवडे बाजार असतो. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तो ही आज बंद ठेवण्यात आला आहे. शिवाय इंदापूर नगरपरिषदेकडून आरोग्य विभागाचे अधिकारी शहरातून वारंवार पेट्रोलिंग करुन शहरातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शिवाय आवश्यक ती तात्काळ मदत देखील करत आहेत. अति महत्वाची सेवा म्हणून काही ठिकाणी रुग्णवाहीका सेवा ही कार्यान्वित ठेवली असून या सर्व घडामोडींना इंदापूरकर उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. तालुक्याच्या खेडोपाड्यातही जागोजागी शुकशुकाट पहायला मिळत असून तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळतोय.
मात्र कोणत्याही तात्काळ मदतीसाठी इंदापूर पोलिस व नगरपरिषद आरोग्य विभाग ही तेवढाच सतर्क आहे.पोलिस विभाग शहरातून व आसपासच्या परिसरातून पेट्रोलिंग करित परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे इंदापूर पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी सांगितलेत.






